Type to search

ब्लॉग सार्वमत

Blog: संशोधीत वाणांमुळे आशा पल्लवीत !

Share

शेतकर्‍यांना शेतीविषयी आधुनिक ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची तसेच विविध वाणांच्या शास्त्रशुध्द माहितीसाठी आणि त्यातून उत्पादन वाढीसाठी महाराष्ट्रात चार विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली. यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात नुकतीच चार विद्यापीठांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आठ वाण, एक कृषी यंत्र, पाच वनस्पती जैविक ताण सहन करणारे स्त्रोत आणि 47 कृषी तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. याविषयी थोडक्यात.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 47 वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीचे उद्घाटन राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या हस्ते झाले. बैठकीच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी व फलोत्पादन तसेच महसूल, मदत, पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी इतर तीनही विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. विलास भाले (अकोला), डॉ. अशोक ढवण (परभणी), डॉ. संजय सावंत (दापोली), महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी परिषदेचे महासंचालक महेंद्र वारभुवन तसेच चारही विद्यापीठांचे संशोधन संचालक तसेच विस्तार शिक्षण संचालक उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक संशोधन डॉ. शरद गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतपिके वाण प्रसारण व शेतपिके वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकारी कायद्यातंर्गत या कृषी विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या आणि त्यास समितीने मान्यता दिली.

या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आठ वाण, एक कृषी यंत्र अवजारे, पाच वनस्पती जैविक ताण सहन करणारे स्त्रोत आणि 47 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशीना मान्यता देण्यात आली. यामध्ये ऊस-फुले 09057 (कोएम 12085), संकरीत कापूस-फुले माही (आरएचबी-1122), भुईमूग-फुले धनी (जे.एल. 1085), नाचणी-फुले कासारी (केओपीएन 942), बोर-फुले शबरी (एस.एल.बी.- 26), डबल बीन/लायमा बीन-फुले सुवर्ण (जीके-11), मेथी- फुले कस्तुरी (जीकेएफ-3), निशिगंध-फुले रजत (जीके-टी-डी-1) हे वाण प्रसारित करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो-मेकॅनिक नियंत्रित तण काढणी यंत्र प्रसारित करण्यात आले आले.

प्रसारित वाण
ऊस – फुले 09057 (कोएम 12085)- या उसाचा फुले दर्जाच्या गुळासाठी शिफारशी करण्यात आली आहे. या गुळाचा उतारा 13.56 टक्के नोंदविण्यात आला आहे. तर गुळाचे उत्पादन 17.61 टन प्रति हेक्टर आहे. 12005 या वाणापेक्षा 16 टक्के जास्त असल्याचे यात म्हटले आहे. हा ऊस चाबूक काणी, तांबेरा, तांबूस ठिपके, पोक्का बोइंग या रोगांना प्रतिकार करू शकतो. तसेच कांडी कीड, शेंडे कीड, खवले कीड या किडी रोगांचा प्रतिकारक आहे. त्यामुळे या उसाचे वाण चांगले असल्याचे म्हटले आहे.

कापूस – फुले माही (आरएचबी-1122) – महाराष्ट्रात सुरू हंगाम लागवडीसाठी संकरित कापूस-फुले माही (आरएचबी-1122) या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. याचे उत्पादन सहा क्विंटल प्रतिहेक्टरी असल्याची शिफारस करण्यात आली आहे. या कापसाचा लांब व तलम धागा आहे. या धाग्याची ताकद 32.9 जी/टेक्स अशी नोंदविण्यात आली आहे. या कापसाचा वाण हा बोंडअळीस सहनशील तसेच तुडतुडे व मावा किडीस प्रतिकारक्षम आहे. कापूस वाणाची देशातील मध्य व दक्षिण विभागासाठी म्हणजे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या भागात राष्ट्रीय स्तरावर शिफारस करण्यात आली आहे.

भुईमूग- फुले धनी-जे. एल. 1085) – भुईमूग हे पीक अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी भुईमूग-फुले धनी-जे. एल. 1085 हे वाणाची शिफारस करण्यात आली आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन हे प्रतिहेक्टरी 30 क्विंटल इतके नोंदविण्यात आली आहे. हे वाण जे. एल. 501 पेक्षा 54 टक्के जास्त असल्याची शिफारशीत म्हटले आहे. या भुईमूग वाणात तीन दाणी शेंगाचे अधिक प्रमाण आहे. आणि यातील तेलाचे प्रमाण हे 51 टक्के आहे. या वाणाची पक्वतेचा कालावधी हा 109 दिवसांचा म्हणजेच साधारण साडेतीन महिन्यांचा आहे. हे वाण पानावरील रोगास तसेच स्पोडोप्टेरा व तुडतुडे या कीडीस प्रतिकारक्षम आहे.

नाचणी- फुले कासारी (केओपीएन 942) – हे धान्य वाण बुटका व न लोळणारा आहे. लांब, सरळ व भरदार कणसे आहेत. राखाडी तपकिरी रंगाचे हे धान्य आहे. या वाणाचा पक्व होण्याचा काळ हा साधारण 100 ते 110 दिवसांचा आहे. याचे उत्पादन प्रतिहेक्टरी 22 क्विंटल आहे. जी. पी. यू. 45 या वाणापेक्षा याची उत्पादन क्षमता 24 टक्के अधिक आहे.

बोर- फुले शबरी (एस. एल. बी.- 26) – या वाणाची शिफारस करताना याची उत्पादन क्षमता 26 किलोग्रॅम प्रति झाड आहे. हे फळ अंडाकृती पिवळसर हिरवे आहे. याची चव आंबट गोड असून फूल धारणा ते काढणी कालावधी 150 ते 175 दिवसांचा आहे. हे वाण फळ पोखरणारी अळी व भुरी रोगास सहनशील आहे.
डबल बीन/लायमा बीन-फुले सुवर्ण (जीके-11)- याचे उत्पादन सरासरी 133 क्विंटल हेक्टर आहे. स्थानिक वाणापेक्षा 26 टक्के जास्त आहे. हिरव्या रंगाच्या वळणदार शेंगा असून विषाणूजन्य मोझॅक रोगास प्रतिकारक व मावा किडीस प्रतिकारक्षम आहे.

मेथी- फुले कस्तुरी (जीकेएफ-3)- या भाजी वर्गाचे वाणाची शिफारस करण्यात आली आहे. या वाणाची उत्पादन क्षमता ही स्थानिक वाणापेक्षा 26 टक्के जास्त नोंदविण्यात आली आहे. मेथीची वैशिष्ट्य म्हणजे लालसर कडा असलेली गर्द हिरवी पाने आणि अ जीवनसत्व व तंतुमय पोषणमूल्यांचे प्रमाण अधिक आहे. हे वाण नागअळी, मर व भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे.

निशिगंध- फुले रजत (जीके-टी-डी-1)- दुहेरी पाकळ्यांची फुले आहेत. फुलदांड्याची लांबी 70-80 सेंमी इतकी असून फुलदांड्यावर फुलांचे अधिक प्रमाण आहे. 61 फुले प्रति फुलदांडा असे अशी नोंद करण्यात आली आहे. याची फुलदाणीतील टिकवण क्षमता 11 दिवस असल्याचे शिफारशीत म्हटले आहे. या वाणांबरोबरच ट्रॅक्टर चलित फुले हायड्रो-मेकॅनिक नियंत्रित तण काढणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. दोन झाडांच्या ओळीतील तसेच दोन झाडांच्या मधल्या जागेतील तण काढण्यासाठी याचा उपयोग करण्यात आला आहे. तण काढणीचा पारंपरिक खर्च 2200 ते 2500 रुपये प्रति हेक्टर येतो. या यंत्रामुळे प्रति हेक्टरी 1500 ते 1800 रुपये खर्चात बचत होते.

जगभरात अथवा देशात शेतीविषयी संशोधन होतच असतं. कृषी विद्यापीठाने संशोधन केलेले वाण असो किंवा तंत्रज्ञान हे शेतकर्‍यांपर्यंत जायला हवे. त्यांना याची उत्पादन क्षमता, खर्च या सर्वांचा मेळ कसा घालावयाचा याची माहिती देणे गरजेचे आहे. याचा प्रचार आणि प्रसार हा शेतकर्‍यांपर्यंत वेळेत आणि बांधापर्यंत गेला तरच याचा उपयोग शेतकर्‍यांना होईल. शेतकर्‍यांचे प्रबोधन झाले तरच कृषी विद्यापीठांचा शेतकर्‍यांसाठी उपयोग होईल. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता शेतीत नवनवीन तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करायला हवे.

– रावसाहेब पटारे
9689499708

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!