Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मतदान यंत्रात छेडछाड न झाल्यास ‘वंचित’ सत्तेत येईल

Share

अ‍ॅड. अण्णाराव पाटील : काँग्रेसच्या काळापासून मतदान यंत्रात हस्तक्षेप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी वंचित आघाडीच्यावतीने आयोजित उमेदवारांच्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सेना आणि भाजपचे पदाधिकारी आणि आमदार, खासदार ‘वंचित’च्या संपर्कात असून उमेदवारीसाठी मुलाखती देत आहेत. या वातावरणामुळे राज्यात वंचित आघाडी सत्तेत येईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, मतदान यंत्रात छेडछाड झाल्यास निकाल वेगळा लागेल, अशी भीती वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी व्यक्ती केली.

जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍यांच्या मुलाखतीसाठी अ‍ॅड. पाटील नगरला आले होते. यावेळी रेखा ठाकूर, भारिपचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे उपस्थित होते. अ‍ॅड. पाटील म्हणाले, राज्यात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर वंचित आघाडीची इच्छाशक्ती वाढली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास सरकार बनविण्यासाठी वंचित आघाडीची गरज पडेल अथवा वंचित आघाडीचीच सत्ता येईल. मात्र, दुसरीकडे निवडणुकीपूर्वी भाजप त्यांना मिळणार्‍या जागांचा आकडा जाहीर करत आहेत. यावरून मतदान यंत्रामध्ये हस्तक्षेप होत असून ते यंत्र मॅनेज करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी इशारा दिल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल बदलण्यात आला. तसेच मतदान यंत्रात छेडछाड ही काँग्रेसच्या काळापासून सुुरू आहे. यामुळे काँग्रेस मतदान यंत्राव्दारे निवडणुका टाळण्यासाठी त्यांच्याकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. या उलट लोकसभा निवडणुकीनंतर वंचितने राज्यातील 38 मतदारसंघांत मतदान यंत्रातील सदोष आकडेवारी विरोधात न्यायालयात धाव घेतली असून त्यात तथ्य आढळल्याने न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्या आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले.

आंबेडकर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

वंचितने काँग्रेसकडे वंचित भाजपचा ब संघ असल्याबाबतचा खुलासा, 144 जागा आणि प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार या तीन अटी ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्यास वंचित काँग्रेसला सोबत घेऊ शकते. अन्यथा वंचित 288 मतदारसंघांत लढण्यास सक्षम असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीला सोबत घेण्यास पूर्वीपासून वंचितचा विरोध आहे.

सर्वाची चौकशी व्हावी

भाजप सरकारने ईडी मार्फत आघाडीच्या, मनसेच्या नेत्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, चौकशीचा नियम सर्वांना लागू व्हावा. अजित पवार, सुनील तटकरे यांची चौकशी टाळून भुजबळ, राज ठाकरे यांचीच चौकशी कशी होते, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

वंचितकडेही डॉग वॉच

मतदान यंत्रातील छेडछाडीवर वंचित आघाडी डॉग वॉचच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे. यासाठी वंचितकडे देखील इंजिनिअरची टीम आहे. वंचितमुळे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसतो हे म्हणणे चुकीचे असून गत लोकसभेत काँग्रेसचे दोनच खासदार होते. यामुळे वंचित फॅक्टरचा काँग्रेस- राष्ट्रवादीवर परिणाम नसल्याचा दावा पाटील यांनी केला. वंचितमधून लक्ष्मण माने एकटेच बाहेर पडले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!