वांबोरी येथे कांद्याचे पैसे नाकारणार्‍या व्यापार्‍यांची धुलाई

0

उंबरे (वार्ताहर) – शेतकर्‍यांकडून दोन वर्षांपूर्वी शिवार खरेदीच्या माध्यमातून कांदा खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणार्‍या कात्रडच्या दोन व्यापार्‍यांची संतप्त शेतकर्‍यांनी चांगलीच धुलाई केली. ‘शेतकर्‍यांचे पैसे देता का? तुरुंगात जायचे?’ असा सवाल शेतकर्‍यांनी केला आहे. यामुळे घाबरलेल्या व्यापार्‍यांनी काहींना मध्यस्थी घालत शेतकर्‍यांचे पैसे देण्यास अवधी मागितला आहेे. व्यापारी मार खाऊन गप्प आहेत.

ही घटना काल गुरुवारी (दि. 13) राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सायंकाळी घडली. दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांना पाठीशी घालून शेतकर्‍यांबरोबर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ही शिष्टाई शेतकर्‍यांनी हाणून पाडली. राहुरी तालुक्यातील कात्रड येथील दोन सख्खे भाऊ असलेल्या व्यापार्‍यांनी दोन वर्षांपूर्वी शिवार खरेदी करून शेतकर्‍यांचा कोट्यवधी रुपयांचा कांदा विकत घेतला होता. त्यापोटी काही शेतकर्‍यांना या व्यापार्‍यांनी धनादेश दिले होते. तर काही शेतकर्‍यांना तोंडी बोली करून ‘सलाईनवर’ ठेवले होते.

राहुरी तालुक्यासह या दोन महाभागांनी अन्य तालुक्यांतूनही कोट्यवधी रुपयांचा कांदा खरेदी केलेला आहे. काल सायंकाळच्या सुमारास त्यातील एक व्यापारी वांबोरी येथे आयताच शेतकर्‍यांच्या हाती सापडला. त्यांनी व्यापार्‍याला तगादा सुरू केला. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देताच संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. दुसर्‍या व्यापार्‍यालाही बोलाविण्याचे फर्मान शेतकर्‍यांनी सोडताच तो दुसरा व्यापारीही त्या ठिकाणी हजर झाला.

त्याने शेतकर्‍यांवर दबंगगिरी सुरू करताच तळपायाची आग मस्तकात भिनलेल्या शेतकर्‍यांनी त्याच्यावरही आपला हात साफ करून घेतला.  ही घटना पोलिसांना समजताच दोन पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मध्यस्थी सुरू केली. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिष्टाईसाठी शेतकर्‍यांसमोर हात पुढे केला. मात्र, त्यांची शिष्टाई शेतकर्‍यांनी धुडकावून लावली. एकतर कांद्याचे पैसे द्या, अन्यथा तुरुंगाची हवा खा, असा प्रस्ताव शेतकर्‍यांनी त्या व्यापार्‍यांसमोर ठेवला. यावर रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती.

सध्या शेतकरी अनेक आर्थिक अडचणीतून जात आहेत. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या कांद्याचे अद्याप पैसे नाहीत. दुबार पेरणीचे संकट आ वासून समोर उभे आहे. ढोर मेहनत करून जगविलेला कांदा त्या दोन ठगांच्या हवाली केला. त्याला दोन वर्षांचा काळ लोटला. त्याचे अद्यापही पैसे नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा संताप अनावर होऊन त्यांनी व्यापार्‍यांचाच चांगला समाचार घेतला.

महिलांचाही दणका –
व्यापार्‍यांनी तालुक्यातील कांदा चढ्याभावाने शिवारमाप घेऊन कोट्यवधी रुपयांचा कांदा खरेदी केला. शेतकर्‍यांनी त्या दोन्ही व्यापार्‍यांना पकडून आज वांबोरीत आणले. हे महिला शेतकर्‍यांना समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पैसे कधी देता, असा जबाब विचारला. मात्र व्यापार्‍याकडून उडवाउडवीचे उत्तर आल्याने महिला शेतकर्‍यांचा मारा चढला अन् व्यापार्‍यांची यथेच्छ धुलाई केली.

LEAVE A REPLY

*