Thursday, May 2, 2024
Homeनगरवांबोरीच्या कांदा व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना कोट्यवधीचा दणका

वांबोरीच्या कांदा व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना कोट्यवधीचा दणका

उंबरे |वार्ताहर| Umbare

वांबोरी (ता. राहुरी) येथील एक सुप्रसिद्ध कांदा व्यापार्‍याने अनेक शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयाचा गंडा घालून पसार झाल्याची चर्चा आहे. यामुळे वांबोरीत कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी ‘त्या’ पसार व्यापार्‍याच्या घरी गर्दी करण्यास सुरूवात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ऐन करोना संकटात शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

- Advertisement -

वांबोरी गावाच्या मध्यवस्तीमध्ये राहत असणारा हा तरुण कांदा व्यापारी दहा वर्षांपासून शिवार मापनुसार कांदा खरेदीचा व्यवसाय करत आहे. हा व्यापारी नेहमीच चढ्या भावाने कांदा खरेदी करत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी या व्यापार्‍याला कांदा देत होते. यामुळे या व्यापार्‍याने जिल्ह्यात चांगला जम बसविला होता.

दांडगा संपर्क व अनेकांचा विश्वास संपादन केल्याने शेतकरी या व्यापार्‍याला डोळे झाकून कांदा उधारीवर देत होते.मात्र, गेल्या वर्षभरापासून या व्यापार्‍याचे अंदाजे दहा कोटी रुपयांचे कांदा खरेदीचे पैसे थकीत असल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये आहे. संबंधित व्यापार्‍याने राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कांदे खरेदी केलेले आहेत. आता हे सर्व व्यापारी वांबोरीतील त्याच्या घरी गेले असता त्याचे घर बंद आढळून आले.

या व्यापार्‍याने शेतकर्‍यांच्या शेतात, शिवार फेरीत कांदा खरेदी केल्यामुळे कांदा विक्रीचा कोणताच पुरावा शेतकर्‍यांकडे नसल्याने अडचण झाली आहे. या व्यापार्‍याला फोन केला तर तोही बंद असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या