Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

व्हॅलेंटाईन सर्वांसाठी

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक । प्रतिनिधी

फेब्रुवारी हा महिना रोमान्सचा महिना म्हणून संबोधला जातो. महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात 14 तारखेला येणार्‍या व्हॅलेंटाईन डे ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून अनेकजण साजरा करतात. यंदाचा व्हॅलेंटाईन सुटीच्या दिवशी न आल्यामुळे तरुणाई महाविद्यालयात येऊन हा दिवस साजरी करणार आहे. यामुळे सर्वत्र चर्चा मात्र आजच्या दिवसाचीच आहे.

आपल्या जवळच्या प्रेमळ व्यक्तीला गुलाबपुष्प देऊन हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता तर व्हॅलेंटाईन विक ही संकल्पना रुढ झाली आहे. व्हॅलेंटाईनशी निगडित गेल्या सात दिवसांपासून वेगवेगळी डेज राबविण्यात तरुणाई व्यस्त दिसत होती.

अनेकांनी या विकमध्ये थिम बेस पार्ट्यांनी देखील अनेक मित्र मैत्रिणींनी सरप्राईज दिले. युरोपममधून हा दिवस साजरी करण्याला सुरुवात झाली. विशेषत: ब्रिटन व फ्रान्समध्ये तेथील पक्ष्यांचा तो समागमाचा महिना असतो. समागमासाठी आतुरलेले हे पक्षी गायन व घुमण्याने साद घालतात. त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिक असल्याचे म्हटले जाते.
प्रेम या मानवी भावनेवर कित्येक प्रेमकाव्ये, प्रेमपत्रे, नाटक आणि चित्रपटदेखील आले आहेत. आमची प्रेमभावना आम्हाला व्यक्त करू द्या, अशी आस, 15 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणाईला असते.

असे असले तरी व्हॅलेंटाईनवर अनेकांचे व्यवसाय, उद्योग अवलंबून आहेत. हा दिवस जवळ आला तरी बाजारात तेजी आली नसल्यामुळे हा वर्ग मात्र काहीसा नाराज असल्याचे चित्र आहे.

गुलाबाचे रंग काय दर्शिवतात

  • पिवळे गुलाब : मित्र-मैत्रिणींना देण्यासाठी पिवळे गुलाब देऊन रोझ डे साजरा केला जातो.
  • नारिंगी गुलाब : ज्या व्यक्तीकडे आपल्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत त्यास नारिंगी रंगाचे गुलाब दिले जाते.
  • पांढरे गुलाब : ज्या व्यक्तीला आपण दुखावले आहे, त्या व्यक्तीला सॉरी बोलण्यासाठी पांढरे गुलाब दिले जाते.
  • लाल गुलाब : प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी लाल रंगाचे गुलाब आवडत्या व्यक्तीला दिले जाते. ‘रोझ डे’ च्या दिवशी लाल गुलाब मित्र आणि मैत्रिणींना देतात.

यामूळे साजरा करतात व्हॅलेंटाईन डे

रोमन सम्राट कॅलेडसच्या विचारसरणीनूसार पत्नी, मुलं बाळ नसलेले सैनिक अधिक ताकतवार असतात असे म्हटले जाई. त्याचा विवाहाला विरोधच होता. परंतू त्याच्याविरोधात जाऊन व्हॅलेंटाइनने सैनिकांची लग्न लावले होते. ही बाबत जेव्हा कॅलेडस्च्या लक्षात आली तेव्हा, म्हणून त्याचा शिरच्छेद करण्यात आला होता. तेव्हापासून 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे साजरी करण्यात येतो. हीर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनू जोड्या प्रेमाची आठवण करुन देतात.

गुलाबाने खाल्ला भाव

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बाजापेठेत फुलांचे भाव काहीसे वधारलेले असतात. आज सकाळी नाशिकमधील प्रसिद्ध फुलबाजारात गुलाबाची फुले विकत घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारभाव कमी असला तरी इतर दिवसांपेक्षा व्हॅलेंटाईनला व्यवसाय अधिक होत असल्याची प्रतिक्रिया येथील विक्रेत्याने दिली.

व्हॅलेंटाईन डे साजरी करण्याची कारणे

काही लोकांचे मत आहे की, व्हॅलेंटाईनची पुण्यतिथी साजरी करायला फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. तर पाचव्या शतकाच्या शेवटी पोप जिलेसियसने 14 फेब्रुवारी या दिवसाला सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केला. या दिवसाचा प्रेमाशी संबंध स्थापित झाला असे म्हटले जाते.

बाजार घटला

गेल्या काही दिवसांपासून चीनची प्लास्टिकची फुले बाजारात आली आहेत. ही फुलं खराब होत नाहीत, तसेच फुलांच्या नैसर्गिक रंगांचे त्यावर आवरण असते. यामुळे स्थानिक बाजारपेठेत फुलांची मागणी कमी झाली आहे. सध्या पाच ते सात रुपये प्रति फूूल अशी विक्री होत आहे. यासाठी दोन ते अडीच रुपये खर्च गेला तर 50 टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या पदरी पडत आहे. पाण्याची टंचाई असल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. हा अतिरिक्त खर्च शेतकर्‍यांवर पडत असल्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत.

राहुल मौले, गुलाब फूलशेती उत्पादक, शेतकरी

गिफ्ट देण्यापेक्षा भरपूर प्रेम द्या

आपल्या मनातील स्पेशल भावना व्यक्त करण्याचा आजचा दिवस. या दिवसाची प्रत्येकजण खास व्यक्तीसाठी वाट बघत असतो. नात्यात गोडवा भरण्याचे काम या दिवशी आवडीने आणि सवडीनेही होत असतं. बदलत्या जीवनशैलीनुसार प्रेमाचे स्वरूपही बदलत आहे. खरे नि:स्वार्थ प्रेम क्वचितच आढळते. गिफ्ट देण्यापेक्षा प्रिय व्यक्तीच्या आयुष्यात भरपूर प्रेमाचे क्षण दिले पाहिजेत.

श्रद्धा वाकचौरे, विद्यार्थिनी

माझ्यासाठी आजचा दिवस खास

यंदाचा व्हॅलेंटाईन माझ्यासाठी खूप खास आहे. कारण मला आयुष्यभरासाठी माझी व्हॅलेंटाईन भेटली आहे. तिचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी मी पहिले गिफ्ट घेईल, मग मीही तिला देईल. गुलाब देऊन प्रेमाची मागणी घालेल.

मनीष खराडे, व्यावसायिक

व्हॅलेंटाईन सर्वांसाठी

आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी हा खास दिवस असतो. या दिवशी अनेकजण आपल्या मित्र आणि मैत्रिणीविषयी प्रेम व्यक्त करतात. गुलाबपुष्प देवून या दिवशी आपल्या भावना अनेकजण व्यक्त करतात. ‘व्हॅलेंटाईन ड’ेलाच प्रेम व्यक्त करावं असं काही नंसतं केव्हाही व्यक्त होता येतं.

जमुना बर्न अग्रवाल, विद्यार्थिनी

प्रेम व्यक्त व्हावं

दैनंदिन कामातून आपलेपणाची जाणीव व्हावी, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपल्यावर प्रेम असलेल्या व्यक्तीबद्दल आपली भावना व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईनला भेटवस्तू, फुलं, चॉकलेट देऊन आदरभाव व्यक्त होतो.

सायली माळी, योगा शिक्षिका

प्रेम व्यक्त करण्यासाठी विशेष दिवसाची आवश्यकता नसावी

प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्याही विशेष दिवसाची आवश्यकता नाही. हल्लीच्या काळात प्रेमाची व्याख्या बदलली आहे. वस्तुनिष्ठ प्रेमाला अनेकजण भुललेले दिसतात. असं न करता वास्तविकता जाणून आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठल्याही दिवसाची वाट न बघता सर्वांप्रती प्रेमाची भावना व्यक्त करावी.

रेखा मानकर, गृहिणी

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!