वाकी खापरी धरण ठरले संजीवनी; वैतरणा परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

0
कावनई  (किरण रायकर) | गेली अठरा वर्ष प्रतीक्षेत असलेल्या वैतरणा रस्त्यावरील वाकी खापरी धरण पूर्ण होऊन यावर्षी अपेक्षित पाणी साठा झाल्यामुळे धरणालगतच्या गावांना हे धरण संजीवनी देणारे ठरले आहे. हजारो हेक्टर माळरान जमीन ओलिताखाली आल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी पिके घेण्याकडे आपला कल वाढविला आहे.

कधी निधी अभावी तर कधी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तर कधी पुनर्वसनाचे प्रश्न यामुळे तब्बल अठरा  वर्ष कासवगतीने चालणाऱ्या या धरणाचे काम मागील वर्षी पूर्ण करण्यात आले.

या धरणात तब्बल 80 टक्के साठा केल्याने या भागातील अनेक गावांचा सिंचन आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. या पाण्याचा धरणालगतच्या वाळविहीर, कोरपगाव, शिंदेवाडी, भावली, भावलंवाडी, कुरणोली या गावासह धरण ते दारणा नदीपात्रालगतच्या गावांना फायदा होत आहे. यामुळे या गावातील शेतक-यांनी पारंपरिक भात पिकाबरोबर नगदी समजले जाणाऱ्या बागायती पिके घेण्याकडे कल वाढविला आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला : दरम्यान कायम दुष्काळसदृश्य स्थिती असणाऱ्या या धरणालगतच्या गावात पिण्याच्या पाण्याची नेहमी टंचाई जाणवत होतं होती. या टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने अनेक योजना या भागात राबविल्या होत्या. मात्र पाण्याचा स्रोत नसल्याने टंचाईवर मात करता येत नव्हती. मात्र यावर्षीपासून या भागातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या धरणामुळे संपुष्टात आला आहे.

दारणा नदी बारमाही वाहू लागली : इगतपुरी तालुक्याला भेदून जाणारी दारणा नदी पावसाळा वगळता इतर नऊ महिने कोरडी ठाक पडत होती. मात्र शासनाने या नदीच्या उगमस्थानी भावली धरण, त्रिगलवाडी धरण आणि वाकी खापरी या धरणातून नेहमीच आवर्तनामुळे पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने ही नदी बारामहिने दुथडी भरून वाहत असल्याने या धरणाच्या पाण्याचा फायदा नदीकाठच्या गावानाही होत आहे.

माळरानावरही बागायत : पाण्याअभावी केवळ भात पिकावर मदार असलेल्या शेतकऱ्यांनी भातपिकाबरोबर बागायती पिके घेण्यास सुरुवात केली आहे. पडीत असलेल्या माळराणावर काकडी कारले, वागी, गिलके, मिरची आदी पिके ही बागायती शेतीचा विविध प्रयोग केला जात असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

 या भागात पाण्याची गंभीर समस्या नेहमीच जाणवत होती.पिण्यासाठी पाणी मिळत नसताना सिंचनाला पाणी आणायचे कुठून असा प्रश्न नेहमीच पडत होता.मात्र वाकी खापरी धरणात पाण्याचा साठा झाल्याने पाण्याच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत.यामुळे हे धरण आम्हाला संजीवनी देणारे ठरले आहे.

संजय शिंदे,भावली(शेतकरी)

या भागात पाण्याची समस्या गंभीर असल्याने आम्हाला केवळ भातपिकावर समाधान मानावे लागत होते.मात्र धरण झाल्याने भातपिकाला दुय्यम स्थान देत बागायती पिके घेण्याकडे कल वाढला आहे.उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूत उजाड रानमाळची जागा आता हिरव्यागार पिकांनी घेतली आहे.

रामनाथ बचे (शेतकरी)

LEAVE A REPLY

*