Video : वाकी खापरी धरण ओव्हर फ्लो; शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

0
कावनई (किरण रायकर) | इगतपुरी तालुक्यातील वाकी नदीवरील वाकी खापरी धरणाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या अठरा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा विरोध, भूसंपादन, पूनर्वसन आदी कारणांसह निधीच्या तुटवड्यामुळे रखडलेले हे धरण यावर्षी पूर्ण झाल्याने जलसंपदा विभागासह शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावर्षी इगतपुरी तालुक्यात जूलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. वाकी खापरी धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामूळे धरणाचे तीनही धरवाजे उघडण्यात आले आहेत.

धरण ओव्हर फ्लो झाले असून आज धरण्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. ह्या धरणातील साठवलेल्या पाण्यावर ह्या भागातील शेतीव्यवसाय फुलणार असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. धरण भागात निसर्गरम्य वातावरण आणि धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दीही वाढली आहे.

२६८० द.ल.घ.फु. क्षमता असलेल्या वाकी खापरी धरणाचे काम या वर्षी पूर्ण झाल्याने धरणात टप्याटप्याने पूर्ण क्षमतने पाणीसाठा करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे.

धरणात आजपर्यंत १६५५ द.ल.घ.फु. इतका पाणीसाठा  करण्यात झाला आहे. वाकी खापरी धरणाच्या निर्मितीसाठी शासनाने कोरपगाव, शिंदेवाडी, वाळविहीर, पिंपळगाव भटाटा व भावली या गावांचे पुनर्वसन पूर्ण केलेले आहे.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून भरघोस निधी मिळाल्याने या वर्षी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ७० कोटी रूपये इतका अधिक जमिनीच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदलाही मिळाला आहे. दरम्यान, या वर्षी धरणात पाणी साठा करण्यात आल्याने या भागातील शेतीच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात येणार आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत धरणाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

या धरणावर या वर्षी प्रथमच पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत असल्याने नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव,  वाकी खापरी धरणाचे सहाय्यक अभियंता हरिभाऊ गिते, शाखा अभियंता गोकुळ पिळोदेकर, स्वप्नील पाटील,  लक्ष्मण खताळे, कचरू राव , भूवा चौधरी, विठ्ठल खाडे, राहूल दोंदे, सुनिल गायकवाड आदींसह जलसंपदा विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. वाकी खापरी धरण घोटी वैतरणा त्र्यंबकेश्वर मार्गावरच असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

वाकी खापरी धरणाचे काम पूर्णत्वाकडे असतांना ह्या भागात काम करून धरण भागात मोठ्या प्रमाणावर ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. शेतीव्यवसायासह या भागाला नवसंजीवनी देणारे हे धरण लोकांच्या कौतुकाला पात्र ठरले. प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी जे जे करता येणे शक्य होते ते सर्व करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

हरिभाऊ गीते, सहाय्यक अभियंता श्रेणी १ वाकी खापरी धरण

गेली अनेक वर्षापासून केवळ पारंपरिक भात पिकावर अवलंबून राहिलेल्या या भागातील शेतकऱ्यांना हे धरण संजीवनी देणारे ठरणार आहे.हंगामी पिकावर भिस्त न ठेवता धरणातील पाण्याच्या भरवश्यावर आधुनिक पिके,नगदी पिके घेण्यावर आमचा कल वाढला असल्याने अनेक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.हे धरण आमच्या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी वरदान ठरले आहे.

संजय शिंदे,शेतकरी, भावली बुद्रुक.

दृष्टीक्षेपात वाकी खापरी धरण
धरणाचा प्रकार – माती धरण
आजचा पाणीसाठा –  १६५५ द.ल.घ.फू.
धरण क्षेत्रातील पाऊस –  १९१० मी. मी.
एकूण क्षमता – २६८० द.ल.घ.फू.
संपादीत जमीन – १०२७ हेक्टर
धरणाची उंची – ३३ मीटर
धरणाची लांबी – १०५० मीटर
धरण सांडवा लांबी – ४१ मीटर
दरवाजे संख्या –  तीन वक्राकार दरवाजे

LEAVE A REPLY

*