उस्मानाबाद साहित्य संमेलनाचे महानोर उद्घाटक

उस्मानाबाद साहित्य संमेलनाचे महानोर उद्घाटक

पुणे – 

जगातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्य प्रतिभेने गेली पन्नास वर्षांपासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन 10 जानेवारी 2020 रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी शुक्रवारी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10 ते 12 जानेवारी 2020 या दरम्यान उस्मानाबाद येथे होणार आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा या आयोजक संस्थेकडून संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झाली आहे.

मउस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून महानोर यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या सहवासामुळे साहित्यक्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असे तावडे यांनी सांगितले. संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच कार्यक्रम पत्रिका जाहीर होईल,असे तावडे यांनी स्पष्ट केले.

दुसर्‍या भाषेतील साहित्यिक कशाला ?

साहित्य महामंडळाचे कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे असताना तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या प्रयत्नातून तिन्ही वर्षांच्या संमेलनासाठी इतर भाषांमधील प्रतिभावंत लेखकांना उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

90 व्या व 91 व्या संमेलनाचे उद्घाटन हिंदी-इंग्रजीचे प्रख्यात लेखक विष्णू खरे आणि गुजराती लेखक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते झाले. यवतमाळ येथे झालेल्या 92 व्या साहित्य संमेलनासाठी इंग्रजीतल्या सिद्धहस्त लेखिका नयनतारा सहगल यांना हा मान देण्यात आला. मात्र त्यांच्या हस्ते उद्घाटन होऊ शकले नाही.

मराठी साहित्यिकांना इतर भाषेच्या उत्सवासाठी बोलविले जात नाही. मग मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इतर भाषेतील साहित्यिक कशाला,ही महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची भूमिका असल्याने दुसर्‍या भाषेतील साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटनाची परंपरा खंडित झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com