अनिष्ट रूढींना छेद देणारा ‘दशक्रिया’ – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर

0
आजवरच्या कारकिर्दीत ‘दशक्रिया’ सारखा चित्रपट आणि तशी भूमिका कधी साकारायला मिळाली नव्हती. पुरोगामी विचारानं अनिष्ट रूढींना छेद देणारा, जीवन-मरणाचे विविध पदर उलगडून दाखवणारा ‘दशक्रिया’ हा महत्त्वाचा चित्रपट आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याचं काम हा चित्रपट करणार असल्याचे ज्येष्ठ अभिनेते  दिलीप प्रभावळकर म्हटले आहे. प्रभावळकर यांनी पत्रे सावकार ही महत्त्वाची भूमिका या चित्रपटात साकारली आहे.

रंगनील क्रिएशन्सची निर्मिती असलेला दशक्रिया हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे. वेगळी वाट चोखाळणारा नवोदित दिग्दर्शक संदीप पाटील यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. संजय कृष्णाजी पाटील हे या चित्रपटाचे लेखक, गीतकार आणि प्रस्तुतकर्ते आहेत.

साहित्यिक बाबा भांड यांच्या दशक्रिया या लोकप्रिय कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. रूढी परंपरा पाळण्यापेक्षा माणसाबद्दल संवेदनशील विचार करणाऱ्या पत्रे सावकारांच्या भूमिकेद्वारे दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेलं आहे.

त्यांच्यासह या चित्रपटात मनोज जोशी, मिलिंद शिंदे, आदिती देशपांडे, मिलिंद फाटक, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर बालकलाकार आर्या आढाव, विनायक घाडीगांवकर असे अनेक कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

चित्रपटाविषयी प्रभावळकर म्हणाले, ‘चित्रपटासाठी विचारणा होण्यापूर्वी मी दशक्रिया ही कादंबरी वाचलेली नव्हती. मात्र, या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राम कोंडीलकर सतत माझ्या संपर्कात होते.  तुम्ही या चित्रपटाचा प्रमुख भाग आहात असे सांगत होते, पण जेव्हा मी संदीप , राम आणि  संजय पाटील यांना भेटलो आणि संजय पाटील यांनी लिहिलेल्या पटकथेनं मी अतिशय प्रभावित झालो होतो.

तसंच प्रथमच दिग्दर्शन करत असूनही संदीप पाटील यांना चित्रपट कसा करायचा हे नेमकेपणानं माहीत होतं. आजवर मी अशी भूमिका कधीच केली नव्हती. ही टीपिकल सावकाराची भूमिका नाही. या भूमिकेलाही वेगवेगळे पदर आहेत. त्यामुळे वेगळ्या धाटणीचा चित्रपट करायला मिळेल, या विचारातूनच हा चित्रपट स्वीकारला. माझा निर्णय योग्य आहे, हे चित्रीकरण करताना आणि त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर स्पष्ट झालं.’

‘संदीप पाटील यांनी पहिल्या चित्रपटासाठी दशक्रियासारखा विषय निवडणं आणि कल्पना कोठारी यांनी निर्मितीसाठी पुढाकार घेणं हे खरंच धाडसाचं काम आहे. उत्तम चित्रपट होण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट निर्मात्यांनी उपलब्ध करून दिली.

संदीप पाटील यांना माध्यमाची चांगली समज आहे. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खरोखरच उत्तम होता. गारगोटीसारख्या भागात चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. चित्रपटातील कलाकारांची टीम अनुभवी आणि उत्तम होती. चिमुकल्या आर्या आढावनंही सुंदर काम केलं आहे. कादंबरीतला आशय दृश्य माध्यमात तितक्याच ताकदीनं मांडण्यात आला आहे,’ असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

LEAVE A REPLY

*