अवकाळीग्रस्तांना मदतीची प्रतीक्षाच; मे महिन्यातील नुकसानीचा अहवाल सादर

0
नाशिक । मे महिन्यात जिल्ह्याच्या विविध भागात झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईने मान्सून सुरू होऊनही अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळू शकलेली नाही. जिल्हा प्रशासनाने अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी 1 कोटी 19 लाख 67 हजार 615 रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आला आहे.

जिल्ह्यात मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, नाशिक, इगतपुरी, निफाड या सात तालुक्यांना अवकाळीचा तडाखा बसला. 13 एप्रिल रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 680.87 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. 23 गावांतील 826 शेतकर्‍यांचे यात नुकसान झाले.

यात बागायती पिकांखालील 64.01 हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला. बहुवार्षिक फळपिकांखालील बाधित 616.86 हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला. जिरायत तसेच वार्षिक फळपिकांखालील क्षेत्राचे मात्र कोणतेही नुकसान झाले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 1 कोटी 19 लाख 67 हजार 615 रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातला अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

एप्रिलचीही मदत थकित : एप्रिल महिन्यात जिल्ह्याच्या विविध भागात झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 5 कोटी 67 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. 30 एप्रिल रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 3494.52 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. 74 गावांतील 6839 शेतकर्‍यांचे यात नुकसान झाले. यात 542.4 हेक्टर भाजीपाला, 648.45 हेक्टर कांदा, 23.44 हेक्टर मिरची, 3.54 हेक्टर बाजरी तसेच भुईमूग, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. यामध्ये बागायती पिकांखालील बाधित क्षेत्र 1318.4 हेक्टर, वार्षिक फळपिकांखालील बाधित क्षेत्र 40.43 हेक्टर, बहुवार्षिक फळपिकांखालील बाधित क्षेत्र 2136.5 हेक्टर क्षेत्राचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

*