येवला तालुक्यात बेमोसमी पावसाची हजेरी; बळीराजा पुन्हा संकटात

0
file photo

विखरणी | वार्ताहर

येवला तालुक्यातील उत्तर भागात विखरणी, विसापूर, कातरणी, कानडी पाटोदा शिवारात बेमोसमी पावसाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यासह विजा चमकताना दिसत आहेत.

अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांच्या पोटात गोळा आला आहे. पाटोदा व कातरणी शिवारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत.

बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागेतील पिकाला तडे जाण्याची शक्यता आहे. काबाड कष्ट करत तसेच वातावरणीय बदलांपासून द्राक्षाला वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारल्याने यंदाचे शेतकऱ्याचे गणित बिघडले असल्याने पावसाचे आगमन झाले. यामुळे दुहेरी संकटात बळीराजा पुन्हा एकदा सापडण्याची शक्यता आहे.

हातातोंडाशी आलेला घास बेमोसमी पावसामुळे हिरावला जातो की काय अशी भीती या परिसरातील शेतकऱ्यांना वाटत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यास कांदा बियाण्यासाठी तयार केलेले डोंगळे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

द्राक्षाला फटका बसणार

या पावसाने पोटात गोळा आला असून लाखो रुपयांची महागडी औषधे वापरून द्राक्ष बाग उभी करून पीक आणले आहे अगोदरच द्राक्ष पिकाला भाव नाही, त्यात हे संकट उभे ठाकल्यास काय करावे असा प्रश्न उभा रहाणार आहे.

चिंधु बोरणारे, पाटोदा. 

LEAVE A REPLY

*