नाशकात अवकाळी पावसाला सुरुवात

0
नाशिक | कालपासून नाशिक, मुंबईसह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात वातावरणात बदल झाला आहे. ऐन थंडीच्या कडाक्यात अवकाळी पावसाने नवीन नाशिकमध्ये हजेरी लावली.अशा वातावरणात साठवून ठेवलेल्या धान्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. धान्याला बुरशीजन्य रोगाची लागण होण्याची शक्यता असून काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ञांकडून करण्यात आले आहे.

आज पहाटेच्या सुमारास जळगाव आणि औरंगाबादमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये कालपासून ढगाळ वातावरण आजही कायम आहे.

मुंबईतदेखील पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. रब्बी हंगामात हरभरा, गहू सारख्या पिकांना आता कडाक्याच्या थंडीची आवश्यकता असताना अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे गव्हावर करपा पडण्याचीदेखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना सतर्क राहून या संकटाला तोंड द्यावे लागणार असून वेळोवेळी फवारणी करून पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे. अचानक झालेल्या वातावरणीय बदलांमुळे शेतकर्यांचा रब्बी हंगामातील खर्चाचा आकडा यामुळे वाढणार असून शेतकऱ्याचे आर्थिक गणित चुकणार आहे.

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून साठवून ठेवलेल्या धान्याची काळजी घ्यावी. अन्यथा बुरशीजन्य रोगांची लागण धान्यावर झाल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या उन्हाची गरज असते तेव्हाच हे धान्य  वर्षभर साठवून ठेवता येते. अचानक झालेल्या वातावरातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. असे हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

*