बेपत्ता पाटील यांच्याबाबत अधिकार्‍यांत अस्वस्थता

कर्मचारी संघटनांची आंदोलनाची तयारी

0
नाशिक | दि.२७ प्रतिनिधी – कार्यालयीन कामास त्रासून जग सोडून जात आहे. मला माफ करा, एक चांगला अधिकारी होण्याचा, चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी आता कामाला त्रासून हे पाऊल उचलत आहे. जग सोडून जात आहे, असे चिठ्ठीत लिहून बेपत्ता झालेले महापालिकेचा सहा. अभियंता रवी पाटील यांचा छत्तीस तास उलटूनही अद्याप कोणताही तपास लागलेला नाही. यामुळे महापालिकेतील सर्वच अधिकार्‍यांत कमालीची अस्वस्थता पसरली असून, कर्मचारी संघटना पदाधिकार्‍यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून सहा. अभियंता पाटील अतिकामाच्या ताणतणावात वावरत असल्याची माहिती त्यांच्या सहकार्‍यांनी शनिवारी दिली होती. ग्रीन फिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत व इतर बांधकाम पाडले, म्हणून मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेची मोठी नाचक्की झाली. या प्रकरणाची हाताळणी पाटील यांच्याकडे होती, तसेच वरिष्ठांच्या आदेशावरून पुन्हा माजी महापौर प्रकाश मते यांच्या क्लबला नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाईची जबाबदारी त्यावर सोपविण्यात आल्याची चर्चा होती.

तसेच न्यायालयात माफी मागावी लागल्याने पाटील यांच्यावर नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्यामुळेच संभाव्य कारवाईमुळे पाटील बेपत्ता झाल्याची चर्चाही त्यांच्या सहकार्‍याच्या चर्चेतून पुढे आली आहे. जीवन संपविण्याच्या इराद्याने निघालेले पाटील यांचा आज रात्री ८ वाजेपर्यत कोणताही तपास लागलेला नसल्याची माहिती त्यांच्या सहकारी अधिकार्‍यांकडून देण्यात आली. शहर पोलिसांची पथके त्यांचा तपास करीत असली तरी पाटील यांच्या कुटुंबीयांंकडून त्यांचे मित्र मंडळी-नातेवाईकांकडूून त्यांचा शोध घेतला जात आहे.

गेल्या १६ मे रोजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल दोन अतिरिक्त आयुक्तांंसह सर्वच विभाग व खातेप्रमुख अशा २४ अधिकार्‍यांना कर्तव्यास कसुरी केल्याबद्दल कारणे दाखवा नोटिसा बजावली होती. याच दिवसापासून महापालिकेतील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यात अस्वस्थता पसरली असून, ती कायम असल्याचे शनिवारी पाटील बेपत्ता झाल्यानंतर दिसून आली.

आजपर्यंत महापालिकेत कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना सवयीपेक्षा वेगळ्या चौकटीत अपूर्ण मनुष्यबळात काम करावे लागत असल्याचे अतिकामांमुळे प्रचंंड तणावाला सामोरे जावे लागत आहे. हे काम करूनही निलंबन, बडतर्फच्या कारवाईंची टांगती तलवार सर्वाच्या डोक्यावर आहे. पाटील यांच्या बेपत्ता होण्यामुळे आता अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे. पाटील यांच्यावर आलेली वेळ आपल्यावरदेखील येईल, या भीतीने अधिकारी वर्ग अस्वस्थ झाला आहे.

अशाप्रकारे पारदर्शक व गतिमान प्रशासन करण्याच्या शर्थीच्या प्रयत्नात चुका होणार नाही, अशी कोणालाही खात्री देता येत नसल्याने कर्मचारीदेखील हतबल झाले आहेत. अशाप्रकारे कारवाईच्या भीतीने मनोधैर्य गमावलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांकडून सांत्वन होत नसल्याने आता महापालिकेतील कर्मचारी संघटनांकडून आंदोलनाची तयारी केली जात आहे.

LEAVE A REPLY

*