यूजीसीकडून महिलांना अनोखी भेट; जागतिक महिला दिनाचे औचित्य; नव्या फेलोशिप, शिष्यवृत्तीची घोषणा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । भारत पगारे

‘बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ’ यातून महिला सशक्त होत आहेत. सर्वच स्तरावर महिलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष्य दिले जात असून 8 मार्च रोजी साजर्‍या होणार्‍या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महिलांचे शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी नव्याने शिष्यवृत्ती व फेलोशिप देण्याचे जाहीर केले आहे. यासह देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांंना 1 ते 8 मार्चपर्यंत विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. त्यानुसार, देशात महिलांना समान संधी मिळावी आणि त्यांना सन्मानाने देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावता यावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार यावर्षीदेखील आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणार आहे. उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढावा; यासाठी यूजीसीने अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचाच हा एक भाग म्हणून यूजीसीकडून महिला दिनानिमित्त नव्या तीन विशिष्ट शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींसाठी संशोधन शिष्यवृत्ती, महिलांसाठी पोस्ट-डॉक्टरेट फेलोशिप, सामाजिक विज्ञानातील मुलीसाठी स्वामी विवेकानंद फेलोशिप व इंदिरा गांधी स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

यासह आयोगाकडून भारतीय विद्यापीठे व महाविद्यालयांमधील महिला अभ्यास केंद्रांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार असून उच्च शैक्षणिक संस्थांमधील महिला कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ रोखणे, प्रतिबंध करणे आणि निवारणासाठी पावले उचलण्यात येत आहेत. विद्यापीठे तसेच महाविद्यालयांमध्ये स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

दरम्यान, देशातील सर्वच महिला विद्यापीठे आणि त्यांच्याशी संबंधित महाविद्यालयांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून, 1 ते 7 मार्चपर्यंत, तसेच 8 मार्च रोजी महिलांसाठी कार्यशाळा, व्याख्याने, क्विझ, वादविवाद, पथनाट्ये, मॅरेथॉन, वॉकेथॉन, सायक्लोथॉन, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लिंग संवेदनशीलता, समानता, महिलांचे आरोग्य, शिक्षण, सक्षमीकरण, सुरक्षा आणि सुरक्षा इत्यादींवर लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम आयोजित करावे, असे निर्देश देण्यात आले आहे.

हे उपक्रम राबविण्यासाठी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांनी आवश्यक ती व्यवस्था करून यूजीसीच्या युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टिव्हिटी मॉनिटरिंग पोर्टलवर या कामांचा अहवाल, फोटो व व्हिडिओ लिंकसह www.ugc.ac.in/uamp वर दिनांक 9 मार्च 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अपलोड करावे, असे यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना कळवले आहे.

छळाबाबत येथे करा तक्रार

महिलांच्या लैंगिक छळासंबंंधी तक्रारी नोंदवण्यासाठी यूजीसीने टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. 1800111656 या नंबरवर संबंधितांना तक्रार नोंदवता येईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *