पेन्शनबाबत मोदी सरकार कटिबद्ध : केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय यांचे प्रतिपादन

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी)- महाराष्ट्राबरोबरच देशातील सर्व स्तरातील कामगारांना वाढीव पेन्शनबरोबरच, सर्वांसाठी घरे, आरोग्यदायी विविध सुविधा, जीवन सुरक्षा योजना, अटल पेंशन योजनेबरोबरच इतर सर्व मुलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पेंशनर्स संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन बंडारु दत्तात्रय यांच्या हस्ते झाले. यावेळी बंडारु दत्तात्रय बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. दिलीप गांधी, शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते. श्री. बंडारु म्हणाले की, मी तुमच्यासारखाच एक कामगार आहे.
त्यामुळे मला तुमच्या सर्व प्रश्‍नांची जाणीव असून ते सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन कायमस्वरुपी आपल्या पाठीशी खंबिरपणे उभे आहे. आपल्या देशामध्ये स्त्री-पुरुष समानता असल्याकारणाने महिलांनीही कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये. पुरुषाबरोबरच महिलांनी विविध क्षेत्रात आपले नांव उंचवावे तसेच महिलांचा गौरव केला तरच देशाची प्रगती होईल असे आवाहन करुन बंडारु दत्तात्रय म्हणाले, सामाजिक स्तरावर काम करत असतांना संघटनेला महत्व आहे. त्यामुळे हम साथ साथ है, सबका साथ सबका विकास याप्रमाणे देशाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.
मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपण दिशादर्शक काम उभे करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अटल पेंशन योजना, जीवन सुरक्षा योजनेबरोबरच केंद्र शासन व राज्यशासन राबवित असलेल्या विविध योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करतांनाच अहमदनगरमध्ये कामगारांसाठी 100 खाटांचे सुपरस्पेशालीटी रूग्णालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खा. दिलीप गांधी म्हणाले आपला देश सुजलाम-सुफलाम करण्याची जबाबदारी ही देशातील प्रत्येक नागरिकांची आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे.
सबका साथ-सबका विकासच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांच्या विकासांसाठी एकत्रित काम करणार असल्याचे श्री. गांधी यांनी सांगितले. भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले तीन हजाराची पेंशन योजना लागु करा. एका बाजुला सरकारी कर्मचार्‍याला 50 हजाराच्या पटीत पेंशन मिळते तर खाजगी क्षेत्रातील सर्व स्तरातील कर्मचार्‍यांना एक हजार पेंशन दिली जाते. हे सरकार गरीबांच्या हिताचे आहेत. जेष्ठ नागरीकांना मेडीकल, प्रवास भाडे आदी सुविधा द्याव्यात.
जुन्या कामगारांची बंद केलेली पेंशन पुन्हा चालु करा अशी विनंती माजी खा. वाकचौरे यांनी ना. बंडारू यांना केली. कामगारांच्या प्रश्‍नांच्या सोडवुणूकीसोबतच कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. अशोकराव राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले. यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*