Friday, April 26, 2024
HomeUncategorizedचाळीसगाव : कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाची हत्या

चाळीसगाव : कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाची हत्या

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या काकाच्या जिवावर बेतले

चाळीसगाव, मेहुणबारे – 

तालुक्यातील पिलखोड येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत एकाची हत्या झाली, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली. शेतीच्या बांधाच्या वादातून पुतण्याने सख्ख्या काकाचा पोटात सुरी खुपसून खून केल्याने पिलखोड परिसरात खळबळ उडली आहे. धोंडू सुपडू पाटील(55) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

- Advertisement -

मयत धोंडू सुपडू पाटील(वय55) व बंडू सुपडू पाटील या दोघा भावांमध्ये शेतीच्या बांधावरून किरकोळ वाद होते. त्यातच आज गुरुवारी सकाळी संशयीत आरोपी निखील बंडू पाटील(30)व गौरव बंडू पाटील(24) यांच्यात त्यांच्या घरात जेवणावरून वाद झाले. दोघांच्या आई वडिलांनी जो स्वयंपाक केला तोच खावा लागेल असे सांगितले. हा वाद सुरू असतांना निखीलचा चुलत भाऊ महेश धोंडू पाटील (वय27) हा वाद सोडवण्यासाठी आला.

त्यावेळी निखील व गौरव यांनी महेश याला तु का आला असे सांगत त्याच्याशी वाद घातला. त्यावेळी महेश याचे वडील धोंडू पाटील हे अंगणात आले, तुम्ही घरात का वाद घालत आहेत असे बोलत असतांना गौरव याने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन घराबाहेर उभ्या असलेल्या धोंडू पाटील यांच्या पोटात खुपसला. त्यावेळी महेश हा वडिलांना वाचविण्यासाठी धावला असता त्याच्या खांद्याजवळ पाठीत सुरा खुपसला.

सुरीचा गंभीर वार झाल्याने दोघे बाप लेक जमिनीवर कोसळले. जखमी धोंडू पाटील व त्यांचा मुलगा महेश या दोघांना नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी चाळीसगाव घेऊन जात असतांना रस्त्यातच धोंडू पाटील यांचा मृत्यु झाला. तर गंभीर जखमी झालेल्या महेश पाटील यास चाळीसगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. खून झाल्याची माहिती मिळताच मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, हवालदार कमलेश राजपूत सिद्धांत शिसोदे यांनी तात्काळ धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

पोलीसांनी दोघा संशयित सख्ख्या भावांना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी मेहूणबारे पोलीस ठाण्यात भेट देवून घटनेची माहिती घेतली. मयत धोंडू पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या