जिल्ह्यात १० माध्यमिक शाळा अनाधिकृत

0
नाशिक | दि. १३ प्रतिनिधी- पेठ, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांतील ८ ते १० वी वर्गाच्या १० माध्यमिक शाळा अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे गटशिक्षणाधिकार्‍यांनी प्रत्येक तालुक्यातील अनाधिकृत माध्यमिक शाळांची यादी पाठवली होती. पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेणे टाळावे, असे आवाहन जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी केले आहे.

अनाधिकृत ठरवलेल्या शाळांमध्ये मविप्र शिक्षण संस्थेच्या सर्वाधिक सहा शाळांचा समावेश आहे. यात चांदवड तालुक्यातील वडबारे आणि खडकजांब येथील जनता विद्यालय या दोन माध्यमिक शाळां अनाधिकृत ठरल्या आहेत. येवला तालुक्यातील पाचवी ते ७ वीचे वर्ग भरवणार्‍या अंगणगाव आणि गवंडगाव येथील जनता विद्यालय बंद करण्याची नोटीस माध्यमिक शिक्षण विभागाने पाठवली आहे.

तसेच आडगाव रेपाळ, पिंपळगाव जलाल या दोन गावांत मविप्रच्या आठवी ते दहावीचे वर्ग भरवणारी जनता विद्यालये अनाधिकृत ठरलेली आहेत. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या सिन्नर तालुक्यातील निमगाव येथील माध्यमिक विद्यालय अनाधिकृत शाळांच्या यादीत समाविष्ट आहे. पेठ तालुक्यात सादडपाडा येथील सदभावना बहुउद्देशीय संस्थेचे स्व.गोपीनाथ मुंढे साहेब अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तसेच मालेगाव येथील कंक्राळे माध्यमिक विद्यालय ही आणि पूज्य आहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय या दोन्ही शाळा अनाधिकृत शाळांच्या यादीत समाविष्ट आहेत.

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने अनाधिकृत शाळांच्या प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. तसेच शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पालकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*