Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगाव : जमावबंदीची कठोर अंमलबजावणी; युनानी डॉक्टर्ससह खाजगी परिचारीकांची सेवा घेणार :...

मालेगाव : जमावबंदीची कठोर अंमलबजावणी; युनानी डॉक्टर्ससह खाजगी परिचारीकांची सेवा घेणार : डॉ. आशिया

मालेगाव | येथे ‘कोरोना’ विषाणूची (COVID-19) मोठ्या प्रमाणात रुग्णांना बाधा झाल्याने तेथील परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करून त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबुत करण्यासाठी खाजगी युनानी डॉक्टर्स व खाजगी परिचारीकांची सेवा घेण्यात येणार आहे. त्याच बरोबर क्वारंटाईन रुग्णांसाठी स्वतंत्र शाळा, खाजगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख समन्वयक डॉ.पंकज आशिया यांनी आज दिली.

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव येथे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरचे प्रमुख समन्वयक म्हणून डॉ.पंकज आशिया यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव शहरातील कन्टेन्टमेंट क्षेत्र म्हणुन प्रतिबंधीत केलेल्या भागाची पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत डॉ.आशीया बोलत होते.

- Advertisement -

यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, अपर पोलीस अधिक्षक संदिप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ.आशिया म्हणाले, पोलिस प्रशासनाने लॉक डाऊनचे अनुपालन होईल याबाबतची संपुर्ण व्यवस्था करून जमावबंदीची कठोर अंमलबजाणी करावी. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर कॉन्टॅक्ट रेसिंग करताना आवश्यक ती सर्व मदत संबंधित घटना व्यवस्थापक यांना उपलब्ध करून द्यावी. लॉक डाऊन चे कालावधीत कोणीही व्यक्ती बाधित क्षेत्रांमधून बाहेर येणार नाही अथवा आत जाणार नाही याची चोख व्यवस्था ठेवावी.

अपरिहार्य परिस्थितीत येणाऱ्या, जाणाऱ्या व्यक्तींबाबतच्या नोंदी ठेवण्यात याव्या. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात महत्वाच्या घडामोडी जिल्हा दंडाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी यांना तातडीने अवगत करण्याच्या सुचना दिल्या.

आरोग्य प्रशासनाच्या उपलब्ध वैद्यकीय सेवा सुविधांचा आढावा घेतांना वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, त्यासाठी खाजगी रुग्णालये, शाळा व महाविद्यालयांच्या इमारती अधिग्रहीत करुन सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नागरिकांनी घाबरुन न जाता खबरदारी घ्यावी, प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज असून सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या