उंबरे करपरा नदीवरील दुशिंग बंधार्‍याला ठेकेदाराने फासला ‘चुना’

0

शेतकरी संतप्त; ठेकेदाराची दबंगगिरी; बंधार्‍याचे बांधकाम बनले धोकादायक

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरातील सुमारे 100 एकरांहून अधिक शेतीक्षेत्राला वरदान ठरणार्‍या करपरा नदीवरील दुशिंग वस्ती बंधार्‍याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी लाभार्थी शेतकर्‍यांनी केल्या आहेत. थातूरमातूर काम करून संबंधित ठेकेदाराने जिल्हा परिषद आणि लाभार्थी शेतकर्‍यांना निव्वळ चुना लावण्याचे काम केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी नाते सांगणार्‍या या ठेकेदारावर जिल्हा परिषद काय कारवाई करणार? की त्याला पाठीशी घालणार? याबाबत शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.
बंधार्‍याच्या बांधकामासाठी अत्यंत दुय्यम दर्जाचे साहित्य वापरात आल्यानंतर संतप्त शेतकर्‍यांनी ते काम बंद पाडले. मात्र, संबंधित ठेकेदाराने शेतकर्‍यांवर दबंगगिरी करून माझे जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी नातेसंबंध असल्याची तंबी देऊन शेतकर्‍यांना अरेरावी केली आहे. त्यामुळे आता संतप्त शेतकर्‍यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार करून ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उंबरे गावच्या पूर्व आणि दक्षिण दिशेकडून करपरा ही उपनदी परिसरातून वाहते. या उपनदीचे पात्र मोठे असल्याने त्यावर उंबरे परिसरात बंधारा बांधण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे माजी ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड. सुभााष पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उंबरे परिसरात चार बंधार्‍यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी दोन बंधारे यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. आता या तिसर्‍या बंधार्‍याचे काम सुरू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने लाभार्थी शेतकरी संतप्त झाले आहेत. बांधकाम करताना मातीमिश्रित वाळू, निकृष्ट दर्जाचे डबर वापरण्यात आले असून सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने हा बंधारा धोकेदायक बनला आहे. बंधार्‍याच्या बांधकामाची गुणनियंत्रण पथकाकडून चौकशी करावी, संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई करून त्याची देयके अदा करू नयेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
दरम्यान, या बंधार्‍याचे खोदकाम सुरू असून करपरा नदीलगत बंधार्‍याच्या शेजारी असलेल्या एका शेतकर्‍याने व ठेकेदाराने बंधार्‍याच्या पूर्व बाजूस भराव टाकून नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून करपरा नदीत अतिक्रमण करून एका बाजूस खोदकाम करून मुरूम व वाळू तस्करी चालू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे बंधार्‍याला धोका निर्माण झाला आहे.
पश्‍चिम बाजूस उंबरे-कुक्कडवेढे रस्ता असून नदीला पूर आल्यास हा रस्ता वाहून जाण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शेजारील जाधव वस्तीला धोका पोहोचू शकतो. या बंधार्‍याची पाहणी करून नदीचा प्रवाह पूर्ववत करावा, बेकायदा मुरूम व वाळू वाहतूक बंद करावी, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी एकनाथ ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग, विश्‍वनाथ दुशिंग, चांगदेव ढोकणे, कारभारी ढोकणे, रावसाहेब ढोकणे, आदिनाथ दुशिंग, भारत ढोकणे, जगन्नाथ ढोकणे, गोरक्षनाथ ढोकणे, प्रदीप ढोकणे, प्रकाश जाधव, रामभाऊ ढोकणे, चंद्रकांत ढोकणे, अण्णासाहेब गुंजाळ, शरद ढोकणे आदींसह शेतकर्‍यांनी केली आहे.

संबंधित ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या एका मोठ्या पदाधिकार्‍यांशी आपले नाते असल्याचे सांगून शेतकर्‍यांवर दबंगगिरी केली. त्यामुळे बंधार्‍याचे निकृष्ट काम करूनही जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासन त्या मुजोर ठेकेदारावर कारवाई करणार की नाही? अशी शंका शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, निकृष्ट कामामुळे बंधारा फुटला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहणार असल्याची तंबी संतप्त शेतकर्‍यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*