Friday, April 26, 2024
Homeनगरएक महिन्यापासून करजगाव-सोनई पाणी योजना बंद

एक महिन्यापासून करजगाव-सोनई पाणी योजना बंद

महिलांची पाण्यासाठी पायपीट; विद्यमान लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष – दोंड

उंबरे (वार्ताहर) – करजगाव-सोनई पाणी योजना गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने राहुरी तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी, पिंप्री अवघड, गोटुंबे आखाडा, यासह 19 गावाला पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई जाणवत आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही पाणी योजना तातडीने सुरू करण्याची मागणी लाभार्थी ग्रामस्थांच्या वतीने पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष अनिल दोंड व ब्राम्हणीचे सरपंच प्रकाश बानकर यांनी केली आहे.

- Advertisement -

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, योजनेकडे आमदार शंकरराव गडाख आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून कर्डिले आमदार असते तर आतापर्यंत ही योजना चालू होऊन पिण्याचे पाणी मिळाले असते.
गेल्या महिन्यापासून ही योजना सपशेल बंद पडलेली आहे. हक्काचे पाणी मिळण्यासाठी आ. गडाख व आ. तनपुरे हे शासनाशी संघर्ष करण्याची भूमिका घेतात.

मात्र, आता त्यांचेच सरकार आल्यावर त्यांनी ही आक्रमक भूमिका बदलली की काय? असा सवाल ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीही ही योजना बंद पडल्यानंतर तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले व उत्तर नगर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी संघर्ष करून ही योजना सुरळीत करून दिल्याची आठवणही या पत्रकात श्री. दोंड व श्री. बानकर यांनी करून दिली आहे.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही ही योजना सुरळीत करण्यासाठी सातत्याने स्वपक्षीयांशी पंगा घेतला होता. ही योजना बंद पडल्याने 19 गावात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. या 19 गावात ऊस तोडणी सुरू असून ऊस तोडणी मजुरांनाही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. योजनेतील वॉल्व्हवाटे निघणार्‍या पाण्यातून ऊस तोडणी मजूर आपली तहान भागवित होते. मात्र, आता वॉल बंद पडल्याने त्यांनाही पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.

ही योजना शिवाजीराव कर्डिले व रावसाहेब खेवरे यांनी बंद पडू दिली नाही. मात्र, आता ही योजना वारंवार बंद पडत असल्याने या योजनेला राजकीय कोलदांडा बसला की काय? अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या