उक्कलगाव देवस्थान ट्रस्टच्या वादावर तात्पुरती मलमपट्टी

0

लवकरच लेखापरीक्षण : कसण्यासाठी जमीन तरुणांच्या ताब्यात, खंडोबा मंदिरासह मंगल कार्यालय बांधण्याचा निर्धार

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशिल व प्रतिष्ठीत समजल्या जाणार्‍या उक्कलगाव येथील ग्रामदैवत हरिहर केशव गोविंद महाराज देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक हिशोबावरून दोघेही माजी सभापती असलेले इंद्रनाथ थोरात व आबासाहेब थोरात यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याने मागील सोमवारी झालेल्या ग्रामस्थ व विश्‍वस्तांच्या बैठकीत याचे तिव्र पडसाद उमटले होते.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार काल सोमवारी(दि.17) रोजी पुन्हा बैठकिचे आयोजन करण्यात आले. याही बैठकित आरोप-प्रत्यारोप व वादळी चर्चा झाली .पण, काही धोरणात्मक निर्णय घेतल्याने धग कायम असली तरी हा वाद तात्पुरता शमला आहे.
मागील बैठकित ठरल्यानुसार सकाळी 10 वाजता विश्‍वस्तांसह ग्रामस्थ व तरुण कार्यर्क्त्यांनी केशव गोविंद मंदिरात हजेरी लावली. मागील बैठकित झालेले वादंग विचारात घेता अशोक कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व देवस्थानचे विश्‍वस्त रावसाहेब थोरात यांनी प्रास्तविकातच देवस्थानचा हिशोब देण्याची तयारी,
खंडोबा देवस्थानचा जिर्णोध्दार, मंगल कार्यालय बांधण्याच्या तरुणांच्या संकल्पनेला होकार अशी भूमिका ट्रस्टच्यावतीने जाहीर करत व्यक्तीगत हेवेदेवे बाजूला ठेवून गावचे गावपण व देवस्थानची अस्मिता याला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन आपले विचार मांडा असे मवाळ आवाहन केले.
मागील बैठकित ठरल्यानुसार माजी सभापती आबासाहेब थोरात बँकेच्या स्टेटमेंटसह हजर होते. त्यांनी सव्वा चार वर्षांत झालेल्या बँक व्यवहाराची आकडेवारी व देवस्थानच्या उत्पनाचे स्त्रोत याचा उहापोह करत बँक स्टेटमेंटमध्ये काही बाबी आक्षेपार्ह वाटत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावरून सोसायटीचे अध्यक्ष बबनराव थोरात व उपसरपंच विकास थोरात यांच्याबरोबर आबासाहेब थोरात यांची शाब्दिक बाचाबाची झाली.
रावसाहेब थोरात व इंद्रनाथ थोरात यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता विकास थोरात यांनी तुम्ही तिघे एकमेकांना सांभाळून घेता आणि आम्हाला उपदेशाचे डोस कशासाठी पाजता? असा आरोप करत देवस्थानच्या व्यवहाराची माहिती आम्हाला झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली. या गदारोळातच आबासाहेब थोरात यांनी गावातील तज्ञ माणसांची कमेटी नेमून देवस्थानच्या हिशोबाचे ऑडिट करा अशी मागणी लावून धरली.
त्यावर हस्तक्षेप करत सोसायटीचे संचालक सुनील भागवत थोरात यांनी 50-60 लाखांच्या हिशोबासाठी ऑडिटर अथवा कमेटी नेमण्याची गरज नाही हा हिशोब आपणच करू शकतो असे म्हणणे मांडले. मात्र, अ‍ॅड.विलास थोरात व विकास थोरात, किशोर जगधने , अनिल थोरात यांनी ऑडिटच झाले पाहिजे व तेही सर्टिफाईड ऑडिटर मार्फत करा अशी जोरदार मागणी केल्याने सर्टिफाईड ऑडिटर मार्फत लेखापरीक्षण करून त्यात दोषी आढळणार्‍यांवर जबाबदारी निश्‍चिती करण्याचे ठरले.
खंडोबा मंदिर बांधकामाबाबत मात्र सकारात्मक निर्णय झाला. मंगल कार्यालयाच्या उभारणीचा विषय चर्चेला आला असता. सध्या शहरात व इतर ठिकाणी अस्तित्वात असलेल्या मंगलकार्यालयाचा नफा-तोटा या बाबी विचारात घेऊन त्यावर निर्णय घ्यावा अशी भूमिका माजी सभापती इंद्रनाथ थोरात मांडली.
त्यावर माजी सभापती आबासाहेब थोरात यांनी मंगलकार्यालयाच्या मागे आर्थिक हेतू नसून, गावातील गोरगरिबांची व्यवस्था व्हावी हा त्यामागील मूळ उद्देश असल्याचे सांगितले. हे मंगल कार्यालय बांधताना अवाढव्य न बांधता खर्चाचा विचार करून बांधावे. 35-36 वर्षांनी होणार्‍या जिर्णोध्दाराची काळजी आताच करू नका हे कलीयुग असल्याने धार्मिकतेपेक्षा तंत्रज्ञानाकडे तरुणांचा ओढा आहे.भूकंप झाला तर कशाचेच अस्तित्व राहणार नाही त्यामुळे सद्य परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्या अशी भूमिका मांडली.
दरम्यान देवस्थानच्या मालकीची सुमारे 22 एकर जमीन विश्‍वस्त मंडळ पहात आहेे. गत गुढी पाडव्याला गावातील काही तरुणांनी एकत्र येत यात्रा कमेटीची सूत्रे आपल्या हाती घेऊन यात्रोत्सव कोणतेही गालबोट न लागता उत्साहात साजरा करून जागेवरच हिशोब दिल्याने आपल्या कारभाराची चुणूक दाखवली होती.
त्याच धर्तीवर ही जमीन कसण्यासाठी या तरुणांच्या ताब्यात द्या, त्यातून आम्ही उत्पन्न काढून दाखवू, खेळते भांडवल म्हणून देवस्थानने आम्हाला 5 लाख रुपये द्यावेत आणि आर्थिक वर्षाच्या अखेरीस आमच्याकडून सगळा हिशोब घ्यावा अशी मागणी सुनील भागवत थोरात यांनी केली यावर विशवस्त मंडळासह सर्वच ग्रामस्थांनी संमती दिल्याने ही जमीन कसण्यासाठी तरुणांच्या ताब्यात देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
जमीन तरुणांच्या ताब्यात देण्याचा निर्णय होताच सोपानराव जगधने यांनी पाच एकर क्षेत्रासाठी उसाचे बेणे विनामूल्य देण्याचे जाहीर केले तर सुनील भागवत थोरात यांनी चालू मशागतीसाठी स्वत:चा ट्रॅक्टर डिझेलसह देण्याचे जाहीर करून आणखी काहींची इच्छा असल्यास ट्रॅक्टर देण्याची विनंती केली. त्याला अनेक तरुणांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या उमद्या तरुणांकडून गावच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत.

अन् तरुणांचा हिरमोड.. –

या बैठकित तरुणांचे नवे विश्‍वस्त मंडळ नेमण्याचे ठरले होते. या विश्‍वस्त मंडळात आपलीच वर्णी लागेल असा अनेक तरुणांचा कयास होता . मात्र, बैठकित यावर कोणताच निर्णय न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. या तरुणांच्या ताब्यात देवस्थानची जमीन दिली आहे. त्यात कोण कसे योगदान देते याचे सहा महिन्यानंतर अवलोकन करून नविन विश्‍वस्त मंडळाची नावे निश्‍चित करू अशी समजूत या तरुणांची काढण्यात आली.

गावचे गावपण टिकून राहावे..-

 तात्पुरती मलमपट्टी करून हा वाद शमला असला तरी त्याची धग कायम आहे.आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या ज्वाला भडकल्याशिवाय राहणार नाहीत असे काही जाणकारांचे मत आहे. मात्र, या गावकीच्या राजकारणात गावचे गावपण व देवस्थानचे पावित्र्य टिकून राहावे एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य ग्रामस्थांची आहे.

LEAVE A REPLY

*