उक्कलगाव हरिहर देवस्थान ट्रस्टचा वाद चिघळला

0
इंद्रनाथ थोरात
आबासाहेब थोरात

इंद्रनाथ थोरात-आबासाहेब थोरात यांच्यात वादंग

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील व प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या उक्कलगाव येथील ग्रामदैवत हरिहर केशव गोविंद महाराज देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक हिशोबावरून दोघेही माजी सभापती असलेले इंद्रनाथ थोरात व आबासाहेब थोरात यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले असून, काल ग्रामस्थांसमक्ष झालेल्या जाहीर बैठकीत याचे पडसाद उमटले.

हरिहर देवस्थानची स्व मालकीची 22 एकर जमीन असून संस्थेचा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत ट्रस्ट आहे. ट्रस्टचा संपूर्ण कारभार माजी सभापती इंद्रनाथ थोरात व अशोकचे ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात यांच्या देखरेखीखाली इतर विश्‍वस्तांच्या सहकार्याने सुरू आहे. यासंदर्भात जनसमुदायास माहिती देताना इंद्रनाथ थोरात म्हणाले, देवस्थान ट्रस्टच्या जमिनीचा ताबा मिळविल्यानंतर ही जमीन विहीर बागायत करून पाईपलाईनचे कामही पूर्ण करण्यात आले.

मिळालेल्या उत्पन्नातून कोट्यवधी रुपये खर्चून देवस्थानचा जीर्णोद्धार पार पडला. केशव गोविंद मंदिरासह गावातील इतर मंदिरांचीही डागडुजी करून जीर्णोद्धार करण्यात आला. दक्षिणमुखी हनुमान मंदिराचाही स्वतंत्र जीर्णोद्धार करण्यात आला. वेळोवेळी नारायणगिरी महाराज सप्ताह, दिंड्या, वार्षिक यात्रोत्सव याला देवस्थान ट्रस्टच्या निधीतून मदत करण्यात आली.

हे सगळे करूनही आजमितीला ट्रस्टकडे सुमारे 23 लाख रुपये फिक्स डिपॉजिटच्या स्वरूपात पडून आहेत. पैकी 15 लाख रुपयांच्या फिक्स डिपॉजिटवर ट्रस्ट स्वबळावर आगामी जीर्णोद्धार करू शकते. निव्वळ शेती उत्पन्नातून ग्रामस्थांच्या विश्‍वासाने व ट्रस्टींच्या सहकार्याने आपण हे करू शकलो.

मात्र, आपण ट्रस्टी असतानाही आपणाला विश्‍वासात न घेता अंधारात ठेवून हे निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आबासाहेब थोरात यांनी केला. गत 10 वर्षांपासून देवस्थानच्या आर्थिक व्यवहाराचा हिशोब ग्रामस्थांना दिला नाही. हा ट्रस्ट आपणाला मान्य नसून, देवस्थानच्या कारभाराची व विश्‍वस्त मंडळाची नवीन पिढीला कल्पना देऊन त्यांच्या हातीच देवस्थानचा कारभार सोपवावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

तोंडी व कागदोपत्री हिशोबावरून आमचे समाधान होणार नसून बँकेच्या स्टेटमेंटसह वेळोवेळी खर्च केलेल्या रकमेचा तपशील द्यावा. सद्य स्थितीत ट्रस्टी म्हणून इंद्रनाथ थोरात, रावसाहेब थोरात, जनार्दन थोरात, सोपानराव जगधने, बन्सीभाऊ थोरात काम पाहतात. ट्रस्टीवर नेमके कोण आहेत, याची आपणाला अद्यापही कल्पना नसल्याचा बहुतांश तरुणांचा होरा होता.

ट्रस्ट स्थापन करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला असल्याचे माजी सभापती आबासाहेब थोरात यांनी उपस्थित ग्रामस्थांच्या लक्षात आणून देत ट्रस्ट स्थापनेमागील उद्देश सांगितला. सुरुवातीला दीर्घकाळ या ट्रस्टवर विश्‍वस्त म्हणून ते कार्यरत होते.

दरम्यानच्या काळात काही विश्‍वस्तांचे निधन झाल्याने 2003 साली पोटनियमानुसार नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यावेळी आबासाहेब थोरात सहीसाठी हजर राहिले नसल्याचा आरोप इंद्रनाथ थोरात यांनी केला; तर आपण गेल्या 20 वर्षांपासून एकच सीमकार्ड वापरत असून आपणाला संबंधितांकडून कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याचे आबासाहेब थोरात यांनी सांगितले.

इतर मंदिरांचा आगामी जीर्णोद्धार करताना देवस्थानच्या जमिनीलगत असलेल्या खंडोबा मंदिराचा मात्र जीर्णोद्धार करण्यात आला नाही. याला ट्रस्टी बरोबर मी स्वत:ही जबाबदार असून विशवस्त मंडळाकडून सापत्न भावाची वागणूक दिली जाते. इंद्रनाथ थोरात यांना स्वप्नात अन् पाण्यातही मीच दिसतो. त्यांना माझेच दुखणे आहे असे आबासाहेब थोरात यांनी म्हणताच मला तुम्ही कुठेच दिसत नाही.

माझी केशव गोविंद महाराजांवर श्रद्धा असून, मी काही चूक केली असेल तर त्याचे प्रायश्‍चित्त भोगायला मी तयार आहे असे इंद्रनाथ थोरात यांनी ठणकावून सांगितले. या शाब्दिक गदारोळात सर्वच ग्रामस्थ बघ्याची भूमिका घेऊन होते. तेथे उपस्थित असलेल्या रावसाहेब थोरात यांच्यासह इतर ट्रस्टींनीही फारसा हस्तक्षेप केला नाही. येणेबाकीवरून दोन्ही माजी सभापतींमधील शाब्दिक युद्ध व्यक्तिगत पातळीवर गेले. काही सूज्ञ ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने उभयतांनी आवरते घेतले.

दरम्यान, या वादाची ठिणगी गत गुढीपाडव्याला झालेल्या यात्रा समितीच्या बैठकीदरम्यानच पडली होती. नितीन थोरात, अनिल जनार्दन थोरात, प्रकाश थोरात, सुनील भागवत थोरात, रवींद्र सोपान जगधने, पुरुषोत्तम थोरात, गुलाब गाडेकर, पंडित थोरात, ज्ञानदेव थोरात, सोमनाथ मोरे, विजय पारखे या तरुण कार्यकर्त्यांसह सर्व समाजातील शेकडो तरुणांनी एकत्र येऊन यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला होता.

यात्रोत्सवाचा हिशोब दिल्यानंतर ट्रस्टचाही हिशोब द्यावा अशी तरुणांमध्ये कुजबूज होती. त्या पार्श्‍वभूमीवर काल झालेल्या बैठकीस ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर राहिले. उक्कलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने व सरपंचपद थेट जनतेतून असल्याने अनेकांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत. या बैठकीला आगामी उक्कलगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा वास असल्याचे ज्येष्ठांसह काही तरुण कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलत होते. उभय माजी सभापतींमधील शाब्दिक बोलाचालीतूनही त्याचा वेळोवेळी प्रत्यय येत होता.

सोमवारी बैठक –  या शाब्दिक गदारोळातच गावातील नवीन तरुणांची ट्रस्टी म्हणून नेमणूक करण्याबाबत पुढील सोमवारी बैठक घेण्याचे ठरवून हरिहर केशव गोविंद महाराज यांचा जयजयकार करत बैठक आटोपती घेण्यात आली. मात्र, सध्या अस्तित्वात असलेले विश्‍वस्त मंडळ उत्तमरीतीने कारभार पाहत असून त्यांच्याच ताब्यात देवस्थानचा व्यवहार ठेवावा असा गावातील काही मंडळींचा दावा असल्याने सोमवारपर्यंत किती अर्ज येतात व कोणाची वर्णी लागते की जुनेच विश्‍वस्त मंडळ कारभार पाहणार याकडे आता सर्वांच्या नजरा असणार आहेत.

आता तिघेही नको अन् त्यांचे कुटुंबही नको – गावातील तिघाही नेत्यांना तालुक्यातही आपण अन् गावातही आपणच लागतो. कार्यकर्ते वार्‍यावर सोडले जातात. त्यामुळेच दोघांच्या भांडणात आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीत आशा दिघे यांना निवडून आणले. पण, आता आगामी काळात यांच्यासह घरातील मुलगा, मुलगी, सून, पत्नी यांना उमेदवारी नको असे ज्ञानदेव थोरात यांनी उभे राहून सांगताच उपस्थितांनी त्याला टाळ्यांच्या गजरात दाद दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

LEAVE A REPLY

*