उक्कलगाव ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा; अधिकार्‍यांना घेतले फैलावर

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील उक्कलगावची 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी झालेली ग्रामसभा विविध विषयांवर साधकबाधक चर्चा होऊन खेळीमेळीत पार पडली.
मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व पडझड झालेल्या घरांचे अद्यापही पंचनामे न झाल्याने उपसरपंच विकास थोरात यांच्यासह सर्वच ग्रामस्थांनी कृषी सहायक श्रीमती वाडेकर यांना फैलावर घेत खडेबोल सुनावले. तर कामगार तलाठी कारभारी यांनी नेहमीप्रमाणे याही ग्रामसभेला गैरहजर राहून आपल्या लालफितीतील कारभाराची चुणूक दाखवली.
सरपंच रुक्मिणीताई फुलपगार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यकालातील शेवटची ग्रामसभा काल सकाळी 10 वाजता सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केलेल्या लाभार्थींच्या यादीचे चावडीवाचन, ग्रामरक्षक दलाची स्थापना आदी विषय यावेळी सुरुवातीलाच निकाली काढण्यात येऊन दिलीप मारुती थोरात यांची ग्रामसुरक्षा दलाच्या अध्यक्षपदी ग्रामस्थांनी सर्वानुमते निवड केली.
उर्वरित कार्यकारिणी निकषानुसार लवकरच निवडण्यात येईल. कर्जमाफीस पात्र लाभार्थींची यादी ग्रामपंचायत व सोसायटी अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मागील पंधरवड्यात अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असताना अद्याप तलाठी अथवा कोणत्याही प्रशासकीय अधिकार्‍यांनी सदर परिसरासह उक्कलगावातील खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत.
गेल्या वर्षीचे पीक विम्याचे व दुष्काळ निधीचे पैसे अद्याप शेतकर्‍यांना मिळालेले नसताना उक्कलगावातील शेतकर्‍यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. याकडे रामू अण्णा थोरात यांनी लक्ष वेधले असता, उपसरपंच विकास थोरात यांनी तेथे उपस्थित असलेल्या कृषी सहायक वाडेकर यांना खडेबोल सुनावत गावात सरसकट पंचनामे करा, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नका, असे म्हटले.
या भागात कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. तरी या भागातील नुकसानग्रस्त पिकांची पहाणी करून पुराच्या पाण्याने बाधित ग्रामस्थांना त्वरित मदत मिळवून द्यावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली. प्रकाश जगधने, शिवाजी थोरात,विकास रामदास थोरात, शरद आनंदराव थोरात यांनी पूर परिस्थितीच्या व्यथा पोटतिडकीने मांडल्या.
कामगार तलाठी कारभारी यांच्या कारभाराविषयी मात्र नाराजीचे सूर उमटले. अनिल जनार्दन थोरात यांनी तलाठी कधीही वेळेवर हजर नसतात, फोन उचलत नाहीत असा आरोप करत त्यांना समज देण्याची मागणी केली. रस्ता व इतर किरकोळ तक्रारींचे निरसन करत चहापानाने ग्रामसभेचा शेवट करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष बबनराव थोरात, प्रकाश जगधने, खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल थोरात, सोसायटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम थोरात, गुलाबराव गाडेकर, एकनाथ थोरात, शिवाजी थोरात, नंदकुमार थोरात, पत्रकार शरद थोरात, भाऊसाहेब मोरे, भरत थोरात, विनोद थोरात, सुनील पारखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

वाकण वस्ती शाळेत बिबट्या…वाकण वस्ती शाळेत बिबट्या…  वाकण वस्ती शाळेत बिबट्या आरामात बसलेला आढळून आला. या शाळेच्या चारही बाजूंनी बागायती क्षेत्र आहे. सुदैवाने सलग तीन दिवस शाळेला सुट्ट्या असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या शाळेला त्वरित वॉल कंपाउंड उपलब्ध करून देण्याची मागणी रामू अण्णा थोरात व गोरख बाबूराव थोरात यांनी केली. यावर सदर प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच मंजुरीस पाठवला असल्याचे उपसरपंच विकास थोरात यांनी सांगितले

LEAVE A REPLY

*