उक्कडगावात भरदिवसा दरोडा : महिला व पुरुषांना बेदम मारहाण, आठ गंभीर

0

20 ते 25 जणांच्या टोळक्याचा धुडगूस 

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्याच्या पूर्व भागातील उक्कडगाव परिसरातील कुंभारवाडा येथील अनिल निवृत्ती निकम व भाऊसाहेब निवृत्ती निकम यांच्या वस्तीवर मोटारसायकलवरून आलेल्या 20 ते 25 अज्ञात दरोडेखोरांच्या टोळक्याने भरदिवसा दरोडा टाकल्याची घटना घडली.
दरोडेखोरांनी लाकडी दांडके, कुर्‍हाडी, लाठ्या-काठ्यांनी महिला व पुरुषांना जबर मारहाण करीत दहशत निर्माण केली. तसेच महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबडण्यासह रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मारहाणीत आठ जण जखमी झाले आहेत.
दरम्यान हा प्रकार चालू असतानाच आ. स्नेहलता कोल्हे या उक्कडगाव येथील पाझर तलाव नंबर 1 ची पाहणी करण्याकरिता तेथे आल्या होत्या. त्याच वेळी निकम वस्तीवर हा प्रकार घडला. दरोडा पडल्याने गावात एकच पळापळ झाली.
गावकर्‍यांनी लुटमार करणार्‍या टोळक्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खामगाव रोडने पळून जाण्यात यशस्वी ठरले असले तरी टोळक्याकडील 11 मोटारसायकली गांवकर्‍यांनी पकडून करून पोलिसांच्या स्वाधीन केल्या.

या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची प्रत्यक्षदर्शिनी दिलेली माहिती अशी, शनिवार (दि. 7) रोजी दुपारी एकच्या दरम्यान, उक्कडगाव गावाजवळ एमएच 15 असा क्रमांक असलेल्या 10 ते 15 मोटारसायकलवरून 20 ते 25 इसम हातात लाठ्या-काठ्या, गज, कुर्‍हाडी घेऊन निकम वस्तीवर आले. त्यांनी आल्या आल्या महिला व पुरुषांवर हल्ला चढवला.

यावेळी निकम वस्तीवरील काही मंडळी आ. कोल्हे यांच्या सोबत बंधारा पाहण्यासाठी व त्यानंतर होणार्‍या कार्यक्रमासाठी गेले होते. दरोडेखोरांच्या टोळक्याने दिसेल त्याला लाकडी दांडके, कुर्‍हाडींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात भाऊसाहेब निकम, दिगंबर सोपान निकम, अनिल निवृत्ती निकम, नानासाहेब दत्तू राऊत, दत्तू बबन निकम, दत्तात्रय बबन निकम,

अनिल निवृत्ती निकम, निवृत्ती आनंदा निकम, अशोक विठ्ठल निकम, कविता भाऊसाहेब निकम, राधा विकास निकम, ललिता अनिल निकम हे जखमी झाले आहेत. या मारहाणीत भाऊसाहेब निकम यांचे डाव्या हाताला व अनिल निकम यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. दत्तात्रय निकम यांच्या नाकावर व खांद्यावर जबर मार लागला आहे. या सर्वांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात, तसेच काही जखमींना वैजापूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत गावकर्‍यांनी दिलेली माहिती, अशी गावातील एक निवृत्त सैनिकाची गावात मोठी दहशत आहे. तो कोणाच्याही सांगण्यावरुन अनेकांच्या कुरापती काढतो आणि गावात भांडण करतो. त्यातून अनेकांचे त्याच्याशी वाद झालेले आहेत. निकम कुटुंबाची या सेवानिवृत्ताच्या कुटुंबाशी आतापर्यंत 8 ते 10 वेळेस वादावादी झालेली आहे. नुकतीच या दोन्ही कुटुंबांत बाचाबाची झाली होती.

त्यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे उक्कडगाव परिसर घाबरून गेला असून घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सागर पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी भेटी दिल्या आहेत. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. गावकर्‍यांनी या सैनिकास बेदम चोप दिल्याचे सांगितले. टोळक्यातील 11 मोटारसायकली गावकर्‍यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात संध्याकाळपर्यंत कोणतीच नोंद झाली नव्हती.

 

LEAVE A REPLY

*