Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedअंड्यांच्या टरफलांचा कॅल्शियम पावडर, खत निर्मितीसाठी उपयोग

अंड्यांच्या टरफलांचा कॅल्शियम पावडर, खत निर्मितीसाठी उपयोग

मुंबई – Mumbai

अंड्यांची टरफले बहुतेक वेळी निकामी म्हणून फेकून दिली जातात. मात्र छत्तीसगढ येथील सरगुजा जिल्ह्यातील महिलांनी अंड्याची टरफले उपयोगात आणण्याची अभिनव कल्पना शोधून काढली आहे. इतकेच नव्हे, तर ही कल्पना उपयोगात आणून या महिला त्याद्वारे हजारो रुपयांची कमाई करीत आहेत.

- Advertisement -

या कामी त्यांना स्थानिक प्रशासनाचे सहकार्यही लाभले आहे. अंड्यांची टरफले वापरून या महिला कॅल्शियम पावडर आणि खते तयार करीत आहेत. यासाठी या महिलांना पर्यावरणवादी सी श्रीनिवास यांनी प्रशिक्षित केले आहे.

अंड्याच्या टरफलापासून कॅल्शियम पावडर आणि खते तयार करण्यासाठी अंड्याची टरफले आधी पाण्याने स्वच्छ धुतली जातात. त्यानंतर ही टरफले कडक उन्हामध्ये पूर्णपणे वाळविली जातात. त्यानंतर टरफलांचा चुरा केला जातो. चुरा केल्यानंतर बारीक चाळणीतून हा चुरा चालण्यात येतो. अश्या रीतीने कॅल्शियमची पावडर तयार केली जाते. अशी ही एक किलो पावडर एक क्विन्टल कोंबड्यांच्या दाण्यांमध्ये मिसळली जाऊन हे दाणे कोंबड्यांना खाऊ घातले जातात. त्यामुळे त्यांची कॅल्शियमची गरज पूर्ण होते. या उपक्रमामध्ये स्थानिक प्रशासनासोबतच पशुपालन मंत्रालयाकडूनही सहाय्य मिळत आहे.

अश्या रीतीने कचरा म्हणून फेकून दिली जाणारी अंड्यांची टरफले उपयोगात आणली जात आहेत, व त्याचसोबत महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधनही मिळाले आहे.

कोंबड्यांच्या दाण्यामध्ये मिसळण्याखेरीज अंड्यांची टरफले फुलझाडे आणि इतर पिकांकरिता खते म्हणूनही वापरली जात आहेत. भाज्यांची किंवा फळांची साले आणि तत्सम ओल्या कचर्‍याच्या मानाने अंड्यांच्या सालांचे विघटन होण्यास जास्त काळ लागतो. त्यामुळे ही साले कचर्‍यामध्ये न टाकता यांचा वापर कॅल्शियम पावडर आणि खते म्हणून केला जात आहे.

अंड्याच्या टरफलापासून तयार केली गेलेली कॅल्शियम पावडर 200 रुपये प्रति किलो, तर खते 600 रुपये प्रतिकिलोच्या भावाने विकली जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या