शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पुणतांब्यात

0

पुणतांबा (वार्ताहर)- शेतकरी संपाची कल्पना संपूर्ण देशभर पुढे आणणार्‍या पुणतांबा गावातील शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रविवारी 25 जून रोजी दुपारी 3 वाजता पुणतांबा येथे शेतक़र्‍यांशी संवाद साधण्यासाठी येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिली आहे.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे, सेनेचे जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, पुणतांबा येथील आजी माजी पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री. ठाकरे सकाळी 9 वाजता विमानाने ओझर विमानतळावर येणार आहे. तेथून निफाड व येवला येथे शेतकर्‍यांशी  संवाद साधणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजता जंगली महाराज आश्रमाजवळ समृध्दी महामार्गाबाबद शेतकर्‍यांच्या भावना समजावून घेणार आहे.

त्यानंतर शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात विश्रांती घेतल्यानंतर तीन वाजता पिंपळवाडी मार्गे पुणतांबा येथे शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम, ना. दीपक केसरकर, ना. दादा भुसे, खा. सदाशिव लोखंडे, खा. विनायक राऊत, ना. विजय शिवतारे, संपर्क प्रमुख आ. सुनिल शिंदे आदींसह अनेक मान्यवर तसेच अहमदनगर, औरगांबाद व नाशिक जिल्ह्यातील सेनेचे अनेक आमदार उपस्थित राहणार आहेत.

श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार्‍या शेतकरी मेळाव्यासाठी येथील रुरल हायस्कूलच्या क्रिडागणांत वॉटरप्रुफ मंडप टाकण्यात आला असून पंचवीस हजारापेक्षा जास्त शेतकरी बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी संपाची कल्पना पुढे आणली व याची दखल राज्य सरकार नव्हे तर संपूर्ण देशाला घ्यावी लागली. त्या पुणतांबा येथील शेतकर्‍यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी व शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. ठाकरे पुणतांब्यात आर्वजून येत आहे. असेही श्री. खेवरे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

*