Blog : डेक्कन एअरवेजच्या विमान प्रवासाचा विलोभनीय अनुभव

0
उडाण योजनेअंतर्गत डेक्कन एअरवेजची मुंबई-पुणे विमानसेवा सुरू झाली आहे. या सेवेद्वारे देशदूतचे प्रतिनिधी नील कुलकर्णी यांनी नाशिक ते मुंबई दरम्यान केलेल्या विमानप्रवासाचा हा बोलका अनुभव

नेक वेळा अनिश्चिततेच्या फेर्‍यातून अखेर माझ्या विमानाने नाशिक एअरपोर्टवरुन उड्डाण घेतले आणि विलक्षण आनंदलो.  कारणही तसेच होते. दोन वर्षांपूर्वी गंगापूर धरणाहून सी-प्लेन उडणार होते; त्यावेळीच ठरवले आपण विमानातून नाशिकचे विहंगदर्शन घ्यायचे….गेल्या तीन वर्षापासून हवाई प्रवासाचा आनंद घ्यायचा होता.

दरम्यान, कुंभमेळ्यातही हेलिकॅप्टरवरुन हवाई कुंभदर्शनाची संधी हुकली… त्यामुळे मी हवाईप्रवासासाठी उत्सुक होतो…..अर्थात हा माझा आयुष्यातील पहिला विमान प्रवास नक्कीच नव्हता. या आधी कैक वेळा विमानाने फिरलो तरही गोदामाईने आपल्या अवखळ, खळखळ जलप्रवाहाने समृद्ध हिरव्यागार केलेल्या या सुंदर नगरीचे विहंगावलोक करणे माझे स्वप्न होते ते अखेर परवा पूर्ण झाले.

एअर डेक्कन कंपनीच्या छोटेखानी चार्टर विमान क्र. डीएन-191 या 19 आसनी विमानासाठी अखेर वेळ मिळाली. ओझर विमानतळावर नियोजीत वेळेच्या एक तास आधी गेलो. विमानतळावर नाशिकचे सुंदर वाडे आणि रामायणातील कांचनमृग सीताहरण आणि मरीच राक्षस, रावणाने केलेले सीताहरण या प्रसंगातील फोटो पाहून सुखावलो. तितक्यात एअर डेक्कनच्या स्टाफमेंबर्स आवाज आला ‘सर  यूवर व्हीएकल इज रेडी टू पिकअप यू अ‍ॅण्ड दे विल ड्रॉप यू ऑन रनवे…….’  ‘यूवर फ्लाईट इज रेडी टू टेक ऑफ…’

रेनवेवरील छोटे खाणी विमान बघताच माझ्या तोंडून शब्द निघाले वाह…खरंच क्यूट विमान आहे हे……!

एअर एटेडंन्टने ईमरजन्सीसाठी एक्झिट गेट आणि लाईफ जॅकेट,ऑक्सीजन मास्क वगैरेची माहिती देत शुभप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. माझ्यासह त्या ‘क्यूट’ विमानात एकूण 12 प्रवासी होते. ते विमान आतूनही विलक्षण छोटखानी होते की आपण विमानात बसलो नसून राष्ट्रपतीसाठी असलेल्या लांब मोठ्या मोटारकारमध्ये बसल्याची जाणीव होत होती. काही क्षणात रनवेवरुन धावत विमानाने मुंबईकडे न जाता धुळ्याच्या दिशेन उडाण भरली……

आकाशाकडे झेपावणार्‍या विमानातून पहिल्यांदा नजरेच भरली ती नाशिकची हिरवीगार शेती……….आहह.. हिरव्यागार आखीव रेखीव चौकीनी, आयताकृती आकृत्यातून अवकाशातून दिसणारे हिरवेगार शेती पट्टे, बांधावरीचे मोठे वृक्ष, गोदामाईच्या वरदहस्तामुळे खळखळून वाहणारे कालवे आणि मुंबई-आग्रा महामार्गावरुन धावणार्‍या काडेपेटीच्या आकाराच्या वाहनाचे प्रथम दर्शन झाले.

नाशिकच्या शेतकर्‍यांची कष्टाळू वृत्ती आकाशातून पाहताना आपण खरचे राज्याच्या कृषी राजधानीत राहत असल्याची पावती मिळाली…….आहह……वरुन दिसणारी हिरवीगार शेतीचे तुकडे एखाद्या बालिकेने चौकटी चौकटीच्या रांगोळीत हिरवे रंग भरावेत आणि त्याचे लावण्य उठून दिसावे त्याप्रमाणे वसुंधरेच्या काळ्या अंगणात हिरव्यागार तुकड्यातुकड्यात रांगोळीचे रंग भरावे त्याप्रमाणे नजारा दिसला. पुन्हा विमानाने धुळ्याकडून वळून मुंबईकडे वळण घेतले आणि ओझर विमानतळाची स्वच्छ आखीव-रेखीव काळीशार पांढरे पट्टे मारलेली धावपट्टी नजरेच भरली.

नाशिकमधील नसाप्रमाणे दिसणारे रस्ते आणि महामार्गावरील वाढलेली ट्रफिक विमानातूनही स्पष्ट जाणावली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील विपूल जलसंपदा, कालवे, हिरव्यागार शेतीशह विस्तारलेल्या वसाहती स्पष्टपणे दिसल्या. गोदामाई कशी दिसते याच विचारात असताना काही मिनिटांचे गोदावरीचे दर्शन झाले आणि दुसर्‍याच क्षणी कोणीतरी ओरडून म्हटले हे तर आपले गंगापूर धरण…….! आहाह……..! नाशिकला समृद्ध, हिरवेगार करणारे धरणही आकाशातून तितकेच विलोभणीय दिसले…गंगापूर डॅमचे सर्व दरवाजे आणि विशाल जलाशय नजरेत भरला……वॉव……खरंच किती विलक्षण अप्रतिम दिसला तो धरणाचा काठोकाठ भरलेला जलाशय……सारेच शब्दाच्या पलिकडले…….! अवखळ वळणावळणाने वाहणार्‍या गोदामाईचे काही क्षणच परंतु सुखावणारे दर्शन घेऊन मी सुखावलो.

एव्हाना विमान 12 हजार फूटावरु उडत आहे घोषणा झाली. बोईंग विमान साधारणत: 30 ते 25 हजार फूटावरुन उडत असल्याने खालची दृश्यमानता कमी असते. मात्र हे चार्टर विमान केवळ 12 ते 15 हजार फूटावरुन उडत असल्याने धरतीचा विलक्षण सुरेख नजरा दृष्टीच्या टप्प्यात येतो.

नाशिकचे आयकॉनिक रामकुंड, आहिल्यबाई होळकर पूल शहरातून वाहणारी गोदामाई यावरुन विमान गेलेच नाही याची क्षणभर चुटपूट लागली मात्र काही क्षणातच मुंबईच्या दिशेने अतिजलद झेपावलेल्या विमानाने सह्याद्रीचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येऊ लागले…..अंतरा अंतरा वर दिसणारे जलाशय, सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा दर्‍यार्‍यातील हिरवाई आणि उंच सुळके आणि तांबडे लाल पर्वत आकाशातून अप्रतिम दिसले.

डोंगरावरील छोटे छोटे गाव.. गर्द वनराईने नटलेल्या दर्‍या, कुठे जलाशय तर कुठे नदी कालवे आकाशातून दिसत होतेे.  काही सेंकंदातच एक सुरेख नजरा दिसला………. विशाल गोल निळ्याशार क्षितीजावर पृथ्वीचा गोल गरगरीत क्षितीज दिसला. एरव्ही आपण जमिनीवरुन क्षितीज पाहतांना ते सरळ एका रेषेत ‘क्षितीज’ समांतर दिसते.

परंतु अवकाशातून निळेशार क्षितीज अर्धगोलाकार आणि अंडाकृती दिसते…. आहाहा…….. क्षणभर आपणीही आंतरळवीर राकेश शर्मा यांच्यासारखे अंतरीक्ष झाल्याचा आनंद वाटला.  हा विचार करत असतांना विमान थोडेस कलले आणि त्याने पून्हा वळण घेतले…..खिडकीतून पाहतो तो काय……नेहमी प्रकाशशलाका ओतणार्‍या सूर्यनारायणाचा एक किरण विमानाच्या पात्यावर चमकला आणि तेजस्वी हिर्‍याप्रमाणे चकाकणारा प्रकाशउत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला….. पुढे जाऊन पश्चिम घाटावरील ढगांचे पुंजके अधून मधून पात्याखालून जात राहिले आणि काही क्षण विमान सर्वाच्च उंचीवर गेले आणि तोंडातून सहज उद्गार निघले… आहाहा….हाच खरा अंतराळ…..हाच तो स्वर्ग…..! समोरचा नजराही स्वर्गीय होता….निळ्याशार विशाल क्षितीजावर पिंजलेला कापूस पुंजक्याच्या रुपात ठेवावा आणि त्यामध्ये परीकथेत  शोभावे असे शुभ्र तरल तरंगणारे, हलणारे ढग …क्या बात है……! सारेच स्वर्गीय.. काही क्षण तो अद्भूत नजारा डोळ्यांमध्ये साठवला आणि मग आणखी एक सुरेख चित्र दिसले.

आमचे चार्टर विमान निळ्याशार ढगांमध्ये अगदी अचल, स्थिर ध्यानस्थ उभे आहे असे काही मिनटे जाणवले म्हणजे इतके आरामदायी, स्थिर की जणू आपले विमान हवेत एकाजागी उभे आहे असा तो अनुभव होता………..काही मिनिटातच आणखी एक अद्भूत नजारा डोळ्यांसमोर……!

हिरव्यागार भूछत्र्यांना एका परातीत लावावे आणि आजूबाजूला काही ठिकाणी माती आणि पाणी टाकावे त्याप्रमाणे एक दृश्य आकाशातून दिसले…..काय होते बरं ते?  पाण्याचे नदीसारखे प्रवाह आणि त्यामध्ये उगवलेल्या भूछत्रीच्या आकाराचे काय होते ते…..?

मुंबईमधील खाड्यामध्ये असलेल्या खारफुटीच जंगल होते ते……….! अप्रतिम हिरवेगार खारफुटीचे जंगल…….त्यामध्ये मधूनच दलदल, पाण्याचे आत घुसलेले प्रवाह आणि वरतून दिसणारे ते रम्य दृश्य…….काही मिनीटे त्याचे झालेले विलोभनीय दर्शन……. हा नजरा माझ्या सारख्या निसर्गप्रेमीसाठी पर्वणी ठरला…मग सुरु झाल्या काडेपेटीप्रमाणे दिसणार्‍या इमारती, प्रचंड ट्रफिकने ओसंडून वाहणारे रस्ते पाहताच जाणवले की आता आपण खर्‍या अर्थाने मुंबईत आलो. उड्डाण घेतल्यापासून 47 व्यां मिनिटांनी आमच्या विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक विमान तळाच्या टर्मिनल-1 वर लँडिंग केले.

या हवाई प्रवासात नाशिकची हिरवाई, विपूल पाण्याने भरलेले जलसाठे, कालवे आणि हिरव्यागार नाशिकचे विहंंगावलोक केल्याचे भाग्य पदरात पाडून घेतले. गोदामाईने समृद्ध केलेला आपले शहर खरंच खूपच सौंदर्याने नटलेले आहे.. शेकडो वर्षांपासून नाशिकची तहान भागवणारी गोदामाई जवळून जितकी सुंदर दिसते तितकीच ती अवकाशातून सुरेख दिसते.

गोदानगरीच्या या विहंगम अवर्णनीय हवाई दर्शनाने मी सुखावलो.. आणि गेले अनेक वेळा बदलेली विमानाची वेळ अनिश्चितता याचे खंत त्या 20 हजार फूटावरील अलवार शुभ्र ढगांच्या पुजक्यात…… राकेश शर्मा अंतराळात गेल्यावर तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी त्यांना भारत आकाशातून कसे दिसते असा प्रश्न विचारताच क्षणी त्यांच्या तोंडून उद्गार निघाले होते…सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा… त्याच धर्तीवर मला कुणी विचारले विमानातून गोदानगरी कशी दिसते तर पहिला शब्द माझ्या तोंडी येईल ‘माझे नाशिक हिरवेगार नाशिक , नागमोडी नदी, कालवे अन् तलावांचे सुंदर नाशिक …..! सारे जहाँसे अच्छा गुलशनाबाद हमारा…….!

हा अनुभव घेण्यासाठी तुम्हीही एकदा ‘उडाण’ घ्याच समृद्ध गोदावरुन…………..! जय हो नाशिक………जय गोदामाई……जय सह्याद्री…….!

 

 ओझर विमानतळावर कसे जाल?

नाशिकहून ओझरला जाण्यासाठी शहरातून सिटीबसेस आहेत, परंतु त्यांच्या फेऱ्या कमी आहेत. खाजगी टॅक्सीनेही पंचवटीतून 170 ते 200 रुपयांमध्ये थेट विमानतळापर्यत जाता येते.  मुंबई-आग्रा महामार्गावर दहावा मैल चौकातून डाव्या हाताला वळल्यास (कारभारी हॉटेलपासून) केवळ 5 किमी अंतरावर जानोरी मोहाडीकडे जाणार्‍या मार्गावर मध्ये ओझर विमानतळ आहे.

अवघ्या 15 ते 20 रु. मध्ये खाजगी गाड्या विमानतळाच्या गेटजवळ सोडतात. महामार्गापासून 15 मिनीटांचे हे अंतर आहे. विमानतळावर अद्याप कुठलीही खाद्यपदार्थांची सेवा उलपब्ध नाही परंतु नजीकाच्या काळात लवकरच ती सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 केले यांनी हवाई सारथ्य :

विमानाचा पायलट कॅप्टन एन.एल डांगी आणि किशोर धानी यांनी हवाई प्रवासाची कमान सांभाळली. क्रु मेंबर सुलेखा रॉय आणि जयंत बड्डोपाध्याय यांचे आदरातिथ्य मस्त होते.

-नील कुलकर्णी

LEAVE A REPLY

*