दोन महाराजांवर प्राणघातक हल्ला

0

एकावर चाकूने वार तर दुसर्‍याला कुर्‍हाडीने मारहाण

नेवासा (शहर प्रतिनिधी) –  येथील श्री मध्यमेश्‍वर मंदिरातील दोन प्रमुख महाराजांवर रात्री चोरीच्या उद्देशाने गेलेल्या चोरट्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली असून दोन्हीही महाराजांवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत योगी केशवनाथ महाराज ऊर्फ किसन हरिभाऊ लांडे (वय 70) रा. मध्यमेश्‍वर मंदिर नेवासा (मूळ गाव भायगाव ता. शेवगाव) यांच्या जिल्हा रुग्णालयात जाऊन उपनिरीक्षक गणेश जांभळे यांनी जबाब घेतले.
त्यात त्यांनी म्हटले की, मी रात्री मंदिराबाहेर झोपलो होतो. त्यानंतर बाराच्या दरम्यान तहान लागल्याने मी खोलीत पाणी पिण्यासाठी गेलो असता तीन अज्ञात गुंडांनी खोलीत प्रवेश करत पैसे कुठे आहेत? अशी विचारणा केली. मी घाबरुन ‘कसले पैसे?’ असे विचारले असता त्यांनी त्यांच्या हातातील चाकूने वार करुन जखमी केले.
यात डाव्या हाताची नस कापली गेली. यावेळी खोलीबाहेर झोपलेले माझे गुरू योगी लक्ष्मणनाथ महाराज मुळगाव गोरखपूर (उत्तर प्रदेश ) हे देखील आतमध्ये आले असता तिसर्‍या व्यक्तीने कुर्‍हाडीच्या मागील बाजूने त्यांच्या वरती हल्ला केला त्यांना पाठीत व डोक्यावर मारले त्यामुळे त्यांनाही रक्तश्राव झाला.
चौथा हल्लेखोर मंदिराबाहेर असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान रात्री साडेबाराच्या सुमारास पोलीस आले व त्यांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. फिर्यादीच्या जखमांमधून मोठा रक्तश्राव झाल्याने मंदिर परिसरात रक्ताचा सडा दिसत होता.
त्यामुळे पाहणारे हबकून जात होते. पोलीस यंत्रणेने सकाळी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असता श्‍वान पथकाने मंदिरापासून बस स्थानकापर्यंत सुमारे एक किलोमीटर पर्यंतचा माग काढला. ठसेतज्ज्ञ सहायक पोलीस निरीक्षक सुनीता धुमाळ त्यांच्या पथकातील सुभाष सोनवणे, दिलीप शिर्के, अशोक गुंजाळ यांनी घटनास्थळावरील ठसे घेतले.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप अजबे, संदीप दरंदले, विठ्ठल गायकवाड, गणेश मैड, जयवंत तोडमल,
संभाजी गर्जे, अंकुश पोटे, अशोक नागरगोजे, सोमनाथ कुंढारे, बाबासाहेब लबडे यांनी जखमी योगी केशवनाथ महाराज व योगी लक्ष्मणनाथ महाराज यांना तातडीने रुग्णालयात हलविले. फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 459 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे करत आहे.

रक्तस्त्राव पाहून चोरटे पळाले –  केशवनाथ यांच्यावर केलेल्या चाकू हल्ल्याने जखमांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. हा रक्तस्त्राव पाहून चोरटे पळून गेल्याचे त्यांचे गुरु लक्ष्मणनाथ (वय 75) यांनी म्हटले. अंदाजे 40 वर्षे वयाच्या एकाने माझीच कुर्‍हाड घेऊन मला मारले. मला मुकामार लागल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*