बार असोशिएशनच्या दोन स्वतंत्र निवडणुका

0

कार्यकारिणीचे मतदान 21 डिसेंबरला; वकिलांचे मतदान 8 सप्टेंबरला

अहमदनगर (प्रतिनिधी) – अशिलाचे कोडे सोडविण्यासाठी पळापळ करणार्‍या कायदे निष्णात वकिलांमध्येच दुफळी पडली आहे. अहमदनगर बार असोसिएशनच्या स्थापनेपासून (1960) प्रथमच वकिल संघात फूट पडली. दुफळीचा हा वाद धगधगत असतानाच अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणीविरोधात वकिलांची एकजूट झाल्याने वादाची ठिणगी पडली.

आता मुदतवाढ मिळालेल्या कार्यकारिणीने स्वतंत्रपणे निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करून बारच्या निवडणुकीचा पुन्हा आपटबार वाजविला आहे. कार्यकारिणीचे मतदान 21 डिसेंबरला तर वकिलांचे मतदान 8 सप्टेंबरला जाहीर केले आहे.एकाच बारच्या दोन निवडणूक कार्यक्रमांनी अशिलाचे डोकेही हँग झाले असल्याची चर्चा आहे.

अहमदनगर बार असोशिएशनची स्थापना 1960 साली झाली. तेव्हापासून वकिल संघटनेची निवडणूक कधी होत असत याची खबरबात या कानाची त्या कानाला नसायची. प्रत्येक वर्षी बारला नवीन अध्यक्ष मिळायचा. मात्र गत दहा वर्षांपासून वकिल संघटनेची निवडणूक नगरच्या पटलावर गाजू लागली आहे. मागील दहा वर्षांपासून संघटना कार्यकारिणीत मुदतवाढीचे फॅड सुरू झाले. त्यामुळे जुन्या, ज्येष्ठ वकिलांच्या अध्यक्ष होण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले जाऊ लागले. त्यातूनच वादविवाद सुरू झाले.

यंदा तर निवडणुकीचा कहरच झाला. डिसेंबर 2016 अखेर मुदत संपलेल्या कार्यकारिणीने निवडणूक कार्यक्रम घोषित न केल्याने काही वकिलांनी एकत्र येऊन बारच्या निवडणुकीचा कार्यक्रम लावला. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, महिला सचिव आणि 7 कार्यकारिणी सदस्यांसाठी 8 सप्टेंबरला मतदान घेण्याचे जाहीर करत अ‍ॅड. कल्याण पगार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यापूर्वीच वकिल संघटनेत फूट पडून अहमदनगर सेंट्रल बारची स्थापना झाली. या बारची नोंदणी प्रक्रिया धर्मदाय आयुक्तांकडे प्रोसेसमध्ये आहे.

या वादविवादाच्या ठिणग्या विझत नाही तोच विद्यमान कार्यकारिणीने नव्याने बारच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. 21 डिसेंबरला बारच्या नव्या पदाधिकारी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकाच बारच्या दोन निवडणूक कार्यक्रमांनी बारच्या निवडणुकीचा जणू काही अपटबारच झाला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. निवडणुकीच्या या कार्यक्रमामुळे वकिलांमध्येच वादाची चिन्हे दृष्टीपथास येऊ लागली आहेत. जिल्हा न्यायाधीशांनीच यात हस्तक्षेप करून वादावर पडदा पाडावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हा वकिल संघटनेचे जवळपास एक हजार मतदार आहेत. त्यात 300 ते 400 वकिल हे आजीव सभासद असून उर्वरित सर्वसाधारण सभासद आहेत. 20 ते 25 वर्षे प्रॅक्टीस केल्यानंतर प्रत्येकाला बारचा अध्यक्ष होण्याचे वेध लागतात. मात्र अध्यक्षांच्या मुदतवाढीच्या फॅडमुळे त्यांचा अपेक्षाभंग होऊ पाहत आहे.

कार्यकारिणीचा जाहीर केलेला कार्यक्रम – 
नवीन सदस्य नोंदणी 22 ऑगस्ट ते 27 नोव्हेंबर
निवडणूक प्रक्रियेचा कालावधी 30 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर
मतदान 21 डिसेंबर
निवडणूक निर्णय अधिकारी- अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, अ‍ॅड. विश्‍वनाथ ठाणगे

वकिलांनी जाहीर केलेला कार्यक्रम – 
मतदार यादी घोषित करणे 28 ऑगस्ट
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 1 सप्टेंबर
माघारीची मुदत 4 सप्टेंबर
मतदान 8 सप्टेंबर
मतदानानंतर लगेचच मतमोजणी
निवडणूक निर्णय अधिकारी-अ‍ॅड. कल्याण पगार, अ‍ॅड. महेश काळे

महाराष्ट्र/गोवा बार असोशिएशनच्या सदस्यत्वासाठी धडपड – 
पुढील वर्षी महाराष्ट्र/गोवा बार असोशिएशनची निवडणूक होत आहे. अ‍ॅड. चांगदेव डुबे पाटील, विश्‍वासराव आठरे, दीपलक्ष्मी म्हसे, राधाकृष्ण पुलाटे, अशोक पाटील या नामवंत नगरी वकिलांनी महाराष्ट्र/गोवा बार असोशिएशनचे प्रतिनिधीत्व केले आहे. आता पुढच्या वर्षी कोणत्या नगरी वकिलास संधी मिळणार यादृष्टीने नगर बार असोशिएशनच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र/गोवा बार असोशिएशनच्या निवडणुकीसाठी मतदार व्हेरीफिकेशन सध्या सुरू आहे.

LEAVE A REPLY

*