Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

समृद्धी महामार्गाच्या तळ्यात बुडून दोन तरूणांचा मृत्यू

Share

सिन्नर । प्रतिनिधी

समृद्धी महामार्गासाठी मुरूम व दगड काढल्यानंतर तयार झालेल्या तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची ह्दयद्रावक घटना आज (दि.5) दुपारी 4.15 वाजेच्या दरम्यान तालुक्यातील कोनांबे परिसरात घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की, कोनांबे शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून महार्गासाठी लागणाऱ्या खडीचे उत्पादन देखील याच ठिकाणी करण्यात येते. त्यासाठी लागणारा दगड जमिनीतून काढल्याने तेथे तळे तयार झाले आहे.

मध्यंतरी पडलेल्या पावसाने हे तळे पूर्ण भरले असून सोनांबे येथील विजय मधुकर वारुंगसे (वय 19), गणेश भास्कर वारूंगसे (वय 19) दोघेही रा. सोनांबे हे आज दुपारी या तळ्यावर पोहण्यासाठी गेले होते. दोघांनीही काठावर कपडे काढून पाण्यात उड्या घेतल्या.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या चुलत भावाच्या हे लक्षात आल्याने त्याने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्याचा आवाज ऐकून समृद्धी महामार्गाच्या कामावरील सुरक्षारक्षक धावत आला. मात्र, त्यापूर्वीच दोघेही बुडाले होते.

परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोघांचे शोधकार्य सुरू करण्यात आले. सिन्नर नगरपरिषद अग्नीशमन दलाचे जवान व पांढुर्ली येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांना पाचारण करण्यात आले. सुमारे दीड ते दोन तासाच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह हाती लागले.

घटनेची माहीती मिळताच पोलीस हवालदार एच. ए. गोसावी, रामदास जाधव, बाबा पगारे, किरण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह सिन्नर नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!