Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुणतांबा दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद

Share

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याच्या जवळ असलेल्या गुरसळवस्ती येथे एका आयशरला इंडिका कार आडवी लावून रोख रक्कम, दोन मोबाईल, आठ म्हशी व आयशर असा एकूण 6 लाख 23 हजार 500 रुपायांचा मुद्देमाल लंपास करणार्‍या आरोपींपैकी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नितीन रावसाहेब पडवळ (वय 24) व भैय्यासाहेब कांतिलाल पडवळ (वय 20) (दोघे रा. नांदुर्खी, ता. राहाता) असे अटक केलेल्याची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, 16 सप्टेंबर रोजी हज्जू अमीन शेख (रा. लामजमा, ता. औस जि. लातूर) हे आपल्या जवळील आयशर (क्र. एम. एच. 05 डी. के. 0757) यामध्ये आठ म्हशी घेऊन भिवंडी येथून औरंगाबादकडे जात असताना पुणतांबा फाट्यानजीक गुरसळवस्ती येथे आरोपींनी आयशरला इंडिका आडवी लावून त्यांच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल, म्हशीसह आयशर पळवला होता. याप्रकरणी शेख यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदर गुन्हाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा नितीन रावसाहेब पडवळ याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केला आहे. तो सध्या शिर्डी येथे आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो. हे. कॉ. दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना. अण्णा पवार, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, सचिन अडबल, रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, विशाल दळवी, पो. कॉ. संदीप दरंदले, राहुल सोळुंके, सचिन कोळेकर, शिवाजी ढाकणे यांच्या पथकाने शिर्डी मंदिर परिसरात जावून सापळा लावला. त्याठिकाणी नितीन रावसाहेब पडवळ याला पकडण्यात आले. त्याच्याकडे विचारणा केली असता सदरचा गुन्हा त्यांच्या साथीदारासह केल्याची कबूली दिली. यानंतर भैय्यासाहेब कांतिलाल पडवळ याला ही अटक करण्यात आली.

त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता सदरचा गुन्हा अमोल अशोक मकासरे (रा. पानमळा, शिर्डी, ता. राहाता), राजू भालेराव (रा. सावळीविहीर, ता. राहाता), किरण अर्जुन आरणे, सोनू उर्फ मारी पवार (दोघे रा. डोर्‍हाळे, ता. राहाता), राहुल खरात, फैजल अतीफ शेख (दोघे रा. इनामवाडी, ता. राहाता), कार चालक बापू खराटे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या साथीने केल्याचे सांगितले. सदर आरोपी फरार असून अटक केलेल्या दोघांना पुढील कारवाईसाठी कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर दीपाली काळे-कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!