गुरुनाथ, राधिका आणि शनाया यांनी केले कर्जत तालुक्यात श्रमदान

0
कर्जत (वार्ताहर)- कर्जत तालुक्यातील बाभूळगाव येथे महाराष्ट्रात गाजत असलेल्या माझ्या नवर्‍याची बायको या टीव्ही मालिकेमधील गुरुनाथ त्याची बायको राधिका आणि मालिकेतील दुसरी बायको शनाया हे तिघे काल आले होते आणि त्या दोघींना घेऊन चक्क कर्जत तालुक्यांमध्ये दुपारी बारा वाजता सुमारे एक तासभर श्रमदान केले. त्यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांनी या तिघांचं टाळ्यांच्या गजरातकौतुक केले. आमिरखान यांच्या पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत कर्जत तालुक्यातील 16 गावांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये नगर-सोलापूर या महामार्गावर बाभूळगाव हे गाव आहे. या गावाला गुरुनाथ, राधिका आणि शनाया या तिघांनी काल भेट दिली. या तिघांच्या भेटीबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. फक्त गावकर्‍यांना कुणीतरी सेलिब्रिटी येणार एवढीच माहिती देण्यात आली होती.

आपल्या गावात कोण येणार म्हणून पहाटेपासून सगळे ग्रामस्थ महिला गावाच्या माळरानावर जमले होते. दुपारी अकरा वाजता गाड्यांचा मोठा ताफा त्या ठिकाणी आला आणि ग्रामस्थांनी पाहतात तर काय गाडीमधून चक्क माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेतील गुरुनाथ राधिका खाली उतरले. मालिकेत दाखवल्याप्रमाणे राधिकाने साडी नेसली होती तर शनाया गुरुनाथ त्यांच्या हायफाय पोशाखामध्ये होते. सर्वांनी टाळ्यांचा आणि आवाजाचा एकच गलका केला. यावेळी या तिघांनीही ग्रामस्थांशी पाणी फाउंडेशनच्या कामाबद्दल आणि ग्रामस्थांच्या सहभागाबद्दल चर्चा केली. या तिघांना एकत्र पाहून महिलांमध्येही चर्चा सुरू होती की गुरुनाथ येथेही या दोघींनाही घेऊन आला आहे. तर पुरुष मंडळीत चर्चा होती की मालिकेत दोघींना घेऊन फिरतो व प्रत्यक्षातही त्या दोघींना घेऊन फिरत आहे.

यावेळी ग्रामस्थांशी बोलताना राधिका म्हणाली की प्रत्येक गावात पडणारा दुष्काळ दूर करण्यासाठी पाणी फाउंडेशनने महाराष्ट्रामध्ये वॉटर कप स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील बाभूळगाव येथे सहभागी होणारे सर्व ग्रामस्थ आणि महिलांचे मी अभिनंदन करते. यावेळी त्यांनी प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करताना गावातील वृद्ध आणि लहान मुलांना देखील त्यांच्या वयानुसार काम देऊन यामध्ये सर्वांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन केले. त्याच पद्धतीने वॉटर कप स्पर्धेसाठी आवश्यक असणारे सर्व गुण या गावकर्‍यांनी मिळवावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांनी बाभूळगाव हे गाव महाराष्ट्रामध्ये वॉटर कप स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवेल अशी ग्वाही दिली. मात्र बक्षीस वितरण स्वीकारताना गुरुनाथ, राधिका आणि शनाया या तिघांनीही बाभूळगावचे गावकरी म्हणून उपस्थित राहावे असे आवाहन केले.

यावेळी ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले की आम्ही तुमच्या गावामध्ये आज श्रमदान करणार आहोत म्हणजे आम्ही तिघेही बाभूळगावचे रहिवासी झालो आहोत. त्यामुळे आपण सगळे मिळून वॉटर कप स्पर्धेमध्ये राज्यांमध्ये पहिला क्रमांक मिळवावा. यावेळी सर्व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. ते सर्व एकाच वाहनामधून आले होते. राधिका आणि शनाया यांची जुगलबंदी येथेही ग्रामस्थांना पाहण्यास मिळाली.

LEAVE A REPLY

*