कमकुवत पूलांवरील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; आपत्ती निवारणासाठी सतर्कता राखावी

0
नाशिक : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे.
तसेच जिल्ह्यातील पुलांचे तांत्रिक सर्वेक्षण करून निश्चित केलेल्या कमजोर पूलांवरुन होणारी वाहतूक बंद करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार, आपत्ती निवारण अधिकारी प्रशांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी वासंती माळी, महेश किसवे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहेत. जिल्ह्यात पावसाचे सरासरी प्रमाण पाहता गंगापूर, नांदूरमध्यमेश्वर, पालखेड या आणि इतर धरण प्रकल्पातील पाणी पातळीत पावसाळ्यात कमी कालावधीत अचानक मोठी वाढ होते. अशावेळी संभाव्य आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सज्ज रहावे.

मागील पावसाचे संदर्भ व पुराच्या घटनांचा अभ्यास करून कार्यपद्धतीत(SOP) आवश्यक बदल करावेत.  जलसंपदा विभागाने धरणातील पाणी सोडताना बाधीत होणारे भूभाग विचारात घेऊन काळजीपूर्वक प्रक्रिया राबवावी. यावेळी  उपलब्ध वेळेत नागरीकांना सतर्क करणे, सुरक्षित स्थळी हलवणे अशी कामे तातडीने झाल्यास होणारी जिवीत हानी टाळणे शक्य आहे.

मागील वर्षीचा जिल्ह्यातील सायखेडा,चांदोरी, लोणी, ठेंगोडा, शहरातील गोदाकाठ, मल्हारगेट, काझीगढी आदी भागातील पूरस्थितीमध्ये उद्भवलेली परिस्थितीचा विचार करुन नियोजन केले जावे. यासाठी उपलब्ध होणारी मदत व संपर्क यंत्रणा, वैद्यकिय सुविधा, औषधी, स्थानिक जीवरक्षक, स्वयंसेवक, आपत्ती व्यवस्थपन साधन सामुग्रीचे उत्कृष्ठ नियोजन करावे. यासाठी तालुक्यांना दिलेले साहित्य सज्ज ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

श्री.खेडकर म्हणाले,  जिल्हा आपत्ती निवारण कक्षाबरोबरच 1 जून पासून प्रत्येक तालुकातील नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येतील. याबरोबरच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व संबंधित शासकीय विभागांच्या बैठका आयोजित करुन अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकांना स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित केल्यास आपत्तीच्या स्थितीमध्ये त्यांचा सहभाग महत्वाचा ठरेल, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, पूर बाधित होणाऱ्या नागरीकांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन केलेले असल्यास अडचणी कमी होतील. नागरीकांनी अशावेळी दुर्घटना टाळण्यासाठी काळजी घ्यावी. अशावेळी अफवा  पसरवू नयेत, अनावश्यक गर्दी टाळून सेल्फी काढण्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

श्री. वाघमारे यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच विविध आपत्ती निवारण साधन सामुग्रीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये 500 मीटर भाग प्रकाशमान करणारी टॉवर लाइट, 1 किमी क्षमतेची सर्च बॅटरी लाइट, मेटल कटर, हायड्रॉलिक डोअर किट, बोल्ट कटर अशा साहित्याचा वापराबाबत उपस्थितांना त्यांनी माहिती दिली.

कार्यशाळेस पोलिस, महसूल, मनपा,आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आदी विभागांचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*