ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात दूषित पाणी

0

एप्रिलपासून 421 पाणी नुमने दूषित आढळले 

अहमदनगर (प्रतिनिधी) –जिल्हा परिषदेकडून वारंवार सूचना देऊनही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दूषित पाण्याची समस्या वाढत आहे. विशेष म्हणजे पाणी दूषित आढळल्यास त्याला गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आरोग्य विभागाने पाणी स्रोतांचे पाणी तपासले असता एप्रिलपासून तब्बल 421 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. या पाणी स्रोतांतील पाणी शुद्ध करण्याच्या सूचना देऊन त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. मागील जून महिन्यात 127 पाणी नमुने दूषित आढळले आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या स्रोतांचे पाणी दर महिन्यास तपासले जाते. जलसुरक्षक आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी पाणी नमुने गोळा करून जिल्हा प्रयोगशाळा आणि भूजल विभागाच्या प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठवतात. या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर यातून दूषित पाणी असलेली गावे जाहीर केली जातात. मागील जून महिन्याच्या अहवालात 1 हजार 484 पाणी नमुने तपासले असता त्यातील 127 पाणी स्रोतांतील पाणी दूषित असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
या स्रोतांतील पाणी शुद्धीकरण करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. मात्र असे असताना त्याकडे डोळे झाक करण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. धरणात नव्याने पाण्याची आवक झालेली आहे. आलेले नवीन पाणी कालव्याव्दारे संबंधित गावात पोहोचत आहे. हे पाणी थेट पिण्यास अपायकारक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र, असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून पाणी शुध्दीकरणाकडे कानाडोळा करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे झाले आहे.

स्रोतांतील पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढत असले तरी स्रोतांभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्यात ग्रामपंचायती यशस्वी झाल्याचे आरोग्य विभागाच्याच अहवालावरून स्पष्ट होत आहे. परिसर अस्वच्छ असल्यामुळे अवघ्या 12 ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले आहे. विशेष म्हणजे, मागील जून महिन्यात 127 पाणी स्रोतांचे पाणी दूषित असतानाही बाराच ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले आहे. यामुळे आकडेवारीत घोळ घालण्यात येत असल्याची कुजबुज जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.

जिल्ह्यात चार महिन्यांत 4 हजार 359 पाणी नमुने तपासण्यात आले. त्यातील 421 नमुने दूषित निघाले आहेत. यामध्ये नगर तालुका 38, अकोले 41, जामखेड 20, कर्जत 6, कोपरगाव 14, नेवासे 23, पारनेर 60, पाथर्डी 27, राहाता 5, राहुरी 60, शेवगाव 36, संगमनेर 26, श्रीगोंदे 33 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 32 पाणी स्रोतांचे नमुने दूषित आढळले आहेत.

LEAVE A REPLY

*