Thursday, May 2, 2024
Homeब्लॉगBlog : तुलसी विवाह सोहळा!

Blog : तुलसी विवाह सोहळा!

हिरवीकंच बहरलेली तुळस वार्‍यावर आपसूक डोलत होती.कृष्ण कृष्ण ,कृष्ण कृष्ण गात होती.बारिक बारिक जांभळ्या फुलांच्या मंजिर्‍यांनी फुलली होती. तुळस बहरात होती. जरी घराबाहेर अंगणात स्थान होतं तरी पूजेचे ,नमस्कार घेण्याचे भाग्य लाभले होते….

प्राणवायू देण्याचे हे फार मोठं कर्म करीत जीवन जगत असली तरी कुठे तरी पानोपानी भक्ती रुजलेली होती.एक अलौकिक नातं त्या कृष्णाशी होतं. रुपही तसच मिळाल होतं ..कृष्णासारख सावळं …सारे कृष्णतुळस म्हणायचे.! नांवही तशीच होती.,कृष्णप्रिया,

- Advertisement -

विष्णुप्रिया, नारायणीप्रिया .!

काळी सावळी कृष्णासारखी होते याचा आत्मानंद होता ..काळी सावळी कृष्णासारखी असल्यामुळे सार्‍यांना फार आवडावी ! कदाचित असंच असाव !.. कृष्णाच नाव, कृष्णाचा सावळा रंग,कृष्णाचं सावळ रूप मनात रिसत गेलं !… मनातील विचार प्रक्षेपित झाले आत आत ,खोलवर ! .अंग अंग सावळे झाले.अशी कृष्णाची झाले.

मी कोण आहे? कृष्णाची राधा आहे? की वृंदा ? तुळस होते. पण तनमनाने कृष्णप्रिया होते .

मग तो छंदच लागला…लागला छंद कृष्णाचा ! सतत कृष्ण कृष्ण कृष्ण… कृष्ण कृष्ण! माझा जप बहुधा कृष्णाने ऐकला ! नशिबाने भक्ताने तुलसीदल पूजेला तोडून न्यावे. कृष्णशिरी समर्पित करावे . त्याक्षणी तुळस कृष्णाची होऊन जायची , द्वैत-अद्वैत मिलन व्हायचे. असा कृष्णछंद लागला होता.हे कृष्णवेड वाढतच गेले.हा देह कृष्णमय होऊन गेला.

तशातच कार्तिक महिन्याची द्वादशी आली अन् उत्साहाची नव्हाळी झाली.नववस्र,साज श्रृंगार रुपच पालटलं .कानावर शब्द आलेत “सजली ग तुळशीबाई नवरीसारखी .आज तुळशीचे लग्न आहे! तुलसी विवाह सोहळा”

लग्न ?…तुळशीचे ? कुणाशी ?… थोडं मन घाबरलं! कुणाशी विवाह?

दिव्यादिव्यांची रोषणाई होती.जणू सारा आसमंत दिव्य प्रकाशाने प्रकाशित झाला होता.

पृथ्वीवर स्वर्ग अवतरला होता.झेंडू फुलांच्या

माळांनी मंडप सजला होता.

” कृष्णाला आणलं कां? कृष्ण आणा .अरे लवकर कृष्ण आणा ” ऐकलं आणि मन सुखावलं .कसं कळलं इथल्या लोकांना माझं मनं? कसे कळले माझ्या मनातील माझं कृष्णप्रेम ! कसा कळला माझा प्रियकर ,माझा कृष्ण ! “

किती हा उत्कट कर्तव्यनिष्ठ निस्सिम श्रद्धाभाव , आंतरीक आस्था , परंपरा,,,,

रीती!

…त्यांना तुळशी या आपल्या अंगणातील झाडाचं लग्न करून द्यावसं वाटलं! कोटी कोटी धन्यवाद ! या माणसाच्या जगात करुणा प्रेम आस्था श्रद्धा आहे !!

तुळशी विवाहाची जय्यत तयारी झाली होती.

साग्रसंगीत पूजा झाली .सुरेख तालासुरात मंगलाष्टक गायली.अंतरपाट धरला .

अंतरपाटाच्या त्या बाजूला तो होता !…कोण असेल.?.. कृष्णच असेल नं ?… कृष्णा ,तुला मी वरले आहे .माझ्या मनात ,देहात ,आत्म्यात तूं आहेस ! रोमारोमात तू आहेस!… मी दुसर्‍या कुणाशी लग्न करणार नाही. हृदय धडधडत होते.अंतरपाट सारला ,दोघांमधिल अंतर मिटले. आणि…आश्चर्य !

समोर कृष्ण होता.दोघांच्याही गळ्यात हार घातले.तुलसीविवाहाचा सोहळा संपन्न झाला. धन्य धन्य झाले .आज मी कृष्णाची झाले.तन कृष्णमय झाले .जीवन सारे कृष्णमय झाले.

– मीना खोंड

- Advertisment -

ताज्या बातम्या