बीएसएनएल संपवण्याचा प्रयत्न

मजूर युनियन अध्यक्ष नंबुदरी ः कर्मचारी जाणार दोन दिवस संपावर

0
नाशिक | दि. ३ प्रतिनिधी- भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल या भारत सरकारच्या कंपनीचे विविध कंपन्यांमध्ये विभाजन करून खासगीकरणाच्या माध्यमातून बीएसएनएल कंपनी संपवण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे, असा आरोप करत मजदूर संघाचे अध्यक्ष व्ही.ए.एन.नंबुदरी

यांनी याविरोधात कर्मचार्‍यांनी एकजुटीने लढा उभारण्याचे आवाहन केले. या निषेधार्थ १२ डिसेंबरपासून बीएसएनएल कर्मचार्‍यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय या परिषदेत करण्यात आला. महाराष्ट्र बीएसएनएल कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियनच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाची राष्ट्रीय परिषद नाशिक येथील संचार भवन येथे झाली. यावेळी मजदूर युनियनचे अध्यक्ष नंबुदरी यांनी कामगार धोरणाच्या सरकारच्या उदासीनतेवर टीकास्त्र सोडले.

पाच वर्षे पूर्ण झालेल्या मजुराला ग्रॅच्युईटी मिळाली पाहिजे, किमान मासिक वेतन १८ हजार रुपये मिळाले पाहिजे, कामावर हजर झाल्यापासून ईपीएफ, एएसआय, रजेचा पगार व महागाई भत्ता मिळाला पाहिजे याबाबत कायदेशीर मार्गदर्शनही केले.

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात एकत्रित येऊन लढा देण्याचे आवाहन केले. बीएसएनएलमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून कामगार काम करत आहेत. त्यांना केवळ ५ हजार रुपये देऊन ठेकेदार प्रत्यक्षात बीएसएनएलकडून १२ ते १६ हजार रुपये घेत आहे.

ही लूट थांबवली पाहिजे यासाठी लढा देण्याची व त्यासाठी बीएसएनएलईयू या बीएसएनएलच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेशी समन्वय ठेवण्याची गरज त्यांनी विशद केली. यावेळी संचार क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी मजदूर युनियनचे महासचिव अनिमेष मित्रा, कामगार संघटनेचे परिमंडळ सचिव नागेश नलावडे, अध्यक्ष आप्पा घागरे, सहसचिव जॉन वर्गीस आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एम्प्लॉईज युनियनचे सचिव राजेंद्र लहाने यांनी केले, तर सूत्रसंचालन दुर्गा पाटील यांनी केले. याप्रसंगी राज्यभरातून कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स तसेच बीएसएनएलचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*