त्र्यंबकेश्वराची देव दिवाळी- त्रिपुरारी पौणिमा

0
त्र्यंबकेश्वर (देवयानी ढोन्नर) | श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देव दिवाळीसाठी सज्ज झाले आहे. श्री त्र्यंबकेश्वर मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात खास आकर्षण आहे ते शतकाची परंपरा असलेल्या रथोत्सवाची. त्याची तयारीदेखील पूर्णत्वास आली आहे.

त्र्यंबकेश्वर येथील पेशवेकालीन परंपरेनुसार वर्षाभरात बारा उत्सव साजरे होतात. यामधील रथोत्सव हा एक प्रमुख आहे. त्रिपुरारी पौर्णिमेस साजरा होणार्‍या रथोत्सवास देव दिवाळी म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वरच्या सांस्कृतिक परंपरेचा अनमोल ठेवा असलेला हा सोहळा यावर्षी नेहमीप्रमाणेच उत्साहात होत आहे.

भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर अप्रतिम असे वास्तुशिल्प आहे आणि या देवस्थानकडे दीडशे वर्षांपूर्वीचा शिसवी लाकाडाचा पुरातन कलेचा सर्वोत्तम नमुना असलेला रथ आहे. या भव्यदिव्य रथातून कार्तिक भगवान त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुकुट तीर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी नेण्यात येतो.

मंगल वाद्यांच्या गजरात अग्रभागी चांदीचा मुखवटा असलेली पालखी असते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास रथ कुशार्वतावर पोहोचतो. त्यानंतर श्रींचे स्नान पूजा होऊन रथ मंदिराकडे परत फिरतो. तेव्हा सायंकाळ झालेली असते. विद्युत रोषणाईने झगमगणार्‍या विलोभनीय रथाचे दर्शन घेण्याकरिता भाविक मोठ्या संख्येने लावतात.

नागरिकांनी रथमार्गावर काढलेल्या रांगोळ्या आणि फुलांचे गालीचे, पुष्पवृष्टी असा सारा माहौल विलोभनीय असतो. रथ परतल्यानंतर पूर्व भागातील 108 दीपांची दीपमाळ लावण्यात येते. तेव्हा आसमंत उजळतो. पूर्वी फटाक्यांची आतषबाजी होत होती. आता ती बंद करण्यात आली आहे.

दीड शतकाचा रथ : भगवान त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान संस्थान रथोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला 3 नोव्हें. 1865 रोजी पेशव्यांचे सरदार रघुनाथ विंचूरकर यांनी देवस्थानास अर्पण केल्याचा उल्लेख आहे. संपूर्ण शिसवी लाकडात बांधलेल्या या रथासाठी त्या काळी बारा हजार रुपये खर्च आला होता. जयपूर येथील माणिकचंद रजपूत यांनी हा रथ तयार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

तत्कालीन पद्धतीनुसार रथ देऊन या रथोत्सवासाठी तेव्हा सालाना 300 खर्चाची तरतूद केली होती. याकरिता शेकडो एकर जमीन विंचूर येथे वर्षासन म्हणून देण्यात आली आहे. रथ वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. जगन्नाथपुरीच्या रथानंतर आकर्षक रथ म्हणून याचा उल्लेख केला जातो.

संपूर्ण भारतात अशा प्रकारचे अवघे 38 रथ आहेत. 31 फूट उंच असलेल्या या रथाच्या घुमटावर नवग्रहांच्या प्रतिमा आहेत. तसेच लहान घटांचे काम लक्षवेधी आहे. या रथाचे सारथ्य करण्यासाठी सृष्टीचा निर्माता ब्रह्माची मूर्ती आहे. त्रिपुरासुराचा वध करताना भगवान शिवाचे सारथ्य ब्रह्मदेवाने केले होते, अशी संकल्पना यामागे आहे. पूर्वी हा रथ भाविक दोरखंडाच्या सहाय्याने ओढायचे. कालांतराने यात बदल झाला आणि आज हा रथ बैलांच्या जोड्यांनी ओढला जातो.

पौराणिक महात्म्य : त्रिपुरारी पौर्णिमेस रथोत्सव करताना त्यासंबंधात पौराणिक संदर्भ आहे. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर हाहाकार माजवला असता भगवान शंकराने त्रिपुरासुराशी युद्ध केले. सतत तीन दिवस व रात्र चाललेल्या या घनघोर युद्धाचा शेवट भगवान शंकराने त्रिपुरासुराच्या वधाने केला.

तेव्हा पौर्णिमा होती व सायंकाळ झाली होती. अशा या विजयोत्सवाचे प्रतीक म्हणून सायंकाळी हा रथोत्सव होतो. या भगवान शंकरांचा विजय व्हावा म्हणून कार्तिक पौर्णिमेस अदिमाया पार्वतीने उपवास केला होता व विजयवार्ता समजताच तिने शंकराची मनोभावे पूजा करून साडेसातशे वाती प्रज्वलित केल्या आणि आरती केली. आजही मंदिरात महिला साडेसातशे त्रिपूर वाती लावतात. दीपमाळ लावून हा विजायोत्सव साजरा होतो.

कार्तिकोत्सवास वैकुंठ चतुर्दशीस प्रारंभ होतो. भाविक मोठ्या संख्येने ब्रह्मगिरी जातात. विशेषत: मोठी प्रदक्षिणा करण्याचा प्रघात रूढ आहे. वैकुंठ चतुर्दशीस हरिहरभेट होते. केवळ याच दिवशी भगवान विष्णूला बेल आणि भगावान शंकराला तुळस वाहिली जाते. श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात या दिवशी नित्याच्या त्रिकाल पूजेच्या बरोबरीनेच दुपारी 3 ते 5 दरम्यान विंचूरकरांची पूजा होते. तसेच रात्री महापूजा असते.

रात्री 12 वाजता मंदिरात काढण्यात येते. तसेच ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या मुखवट्यांसह सप्तधान्याची पूजा असते. पौर्णिमेस पुण्याहवाचन, ब्रह्मदेवाची पूजा आदी पूजा होतात.श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील परंपरेनुसार दुपारी ग्रामदेवता महादेवीस भाताचा गाडा बळी म्हणून देण्याची प्रथा आहे.

सकाळी कुशावर्तावर भात शिजवून दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा भात पुरोहितांच्या मंत्रघोषात रेड्यांनी ओढलेल्या गाड्यात ठेवून त्यावर प्रज्वलित मशाल लावून अर्पण केला जातो. तर प्रतिकात्मक म्हणून कोहळा कापला जातो. गावावर आरिष्ट येऊ नये म्हणून परंपरेने हा विधी केला जातो. यावर्षी पौर्णिमा शुक्रवारी दुपारी सुरू होते आणि शनिवारी सकाळी संपते. शुक्रवारी सायंकाळी रथोत्सव आहे तर शनिवारी बळीचा विधी होणार आहे.

कार्तिक पौर्णिमेस या परिसरास विशेष महत्त्व आहे. बहुतांश लोक भाऊबीजेप्रमाणे दिवशी ओवाळी साजरी करतात. शहरात दिवाळीप्रमाणे उत्सव साजरा केला जातो. तुळशी विवाहांची सांगता होत असताना ही देव दिवाळी साजरी होत असते.

LEAVE A REPLY

*