Photo Gallery : निवृत्तीनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ; लाखो वारकरी त्र्यंबकनगरीत दाखल

0
त्र्यंबकेश्वर। श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सुरु झालेल्या यात्रोत्सवानिमित्त माऊली, तुकाराम नामांचा जयघोष दिंड्या त्र्यंबकेश्वर शहरात दाखल होत आहेत. सायंकाळपर्यंत शहरात सहाशेहून अधिक दिंड्या दाखल झाल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या वाढली आहे.

नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर भगव्या पताका घेऊन वारकरी त्र्यंबकच्या दिशेने निघाले असून, सायंकाळपर्यंत गर्दीचा हा ओघ सुरूच होता. मानकरी जुने फडही आले आहेत. दरम्यान, यात्रोत्सवाचा आज मुख्य दिवस असून, उद्या शनिवारी सांगता होणार आहे.

बाळासाहेब महाराज देहुकर, मोहन महाराज बोलपूरकर आदींचे स्वागत संस्थान अध्यक्ष संजय महाराज धोंडगे यांनी केले. प्रत्येक दिंडीचे स्वागत करुन नोंदणी श्रीसंत गजानन महाराज संस्थानद्वारे करण्यात आली. नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार आदींसह नगरसेवकाननीही स्वागत केले.

न. पा. ने पाणी पुरवठा, स्वच्छता आदी सेवांकडे लक्ष ठेवून, त्या कार्यान्वित केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, जिल्हा उपाधिक्षक शाम वळवी, पो. नि. रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव शिस्तबद्ध असतो.

वारकरी अत्यंत संयमाने नाशिक- त्र्यंबक रस्त्यापासून थेट मंदिरापर्यंत येवून, दिंडी ठेप्यावर रवाना होतात. स्वतः चे पहारेकरी, भालदार, चोपदार, स्वयंपाकाची भांडी, पाणी व्यवस्था हे सर्व नियोजन पाहता हा शिस्तीचा व स्वयंसेवेचा सोहळा आहे. वनवासी कल्याण आश्रमाचा निर्मल वारी प्रकल्प राबविण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांसह नागरिकांचे त्याला सहकार्य लाभले आहे.

श्रीकृष्णाजी माऊली दिंडीतील हजारो वारकर्‍यांनी गोल रिंगण करून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी सेवा रूजू केली. रिंगण म्हटले की, प्रमुख्याने आळंदी संस्थानच्या माऊली ज्ञानोबारायांच्या दिंडीची आठवण येते. त्र्यंबकेश्वरला सुमारे 600 दिंड्या येतात.

यात 15 फड आहेत. खेडलेझुंगेची तुकाराम महाराज व जायखेडाची कृष्णाजी माऊली या दोन मोठ्या दिंड्या असून, अत्यंत शिस्तबद्ध म्हणून कृष्णा माऊली दिंडीचा शतकाचा इतिहास आहे. ब्रम्हाव्हॅलीच्या संकुलात गोल रिंगण करून वारकरी परंपरेतील अत्यंत विलोभनीय असे दर्शन या दिंडीने घडविल्याने भाविकांची मने कृतार्थ झाली. संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिंडीचे स्वागत केले.

फुलांच्या रांगोळ्या, अश्वासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला. वारकरी उभे राहून नाचत, गात, साष्टांग नमस्कार करत, लोळण घेत असल्याचा रिंगण सोहळा याची देही, याची डोळा पाहून यात्रेकरुंचा आनंद गगणात मावत नसल्याचे विलोभनिय चित्र दिसले.

LEAVE A REPLY

*