Video : त्र्यंबकेश्वरमधील मजुरांचे अतोनात हाल; डोक्यावरच संसार घेऊन करतायेत परतीचा प्रवास

Video : त्र्यंबकेश्वरमधील मजुरांचे अतोनात हाल; डोक्यावरच संसार घेऊन करतायेत परतीचा प्रवास

सिन्नर | वार्ताहर

कोरोना विषाणूमुळे देशात सर्वत्र लॉक डाऊनची परिस्थिती असून संचारबंदी पाठोपाठ वाहनांच्या ये-जा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीत त्र्यंबकेश्वरच्या गारमाळ या  आदिवासी पाड्यातील शेकडो कुटुंबे मोलमजुरीच्या कामासाठी बाहेरगावी अडकून पडले असून पर्याय नसल्याने या मजुरांचे जथ्थे पायी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोळा मजुरांचा गट राहता तालुक्यातील वाकडी येथे एका द्राक्षाच्या शेतावर मजूर म्हणून कार्यरत होता.

कोरोनामुळे गावाकडे परतीचे मार्ग बंद झाले असले तरी उपासमार करण्यापेक्षा पायी प्रवास करून गावी परत जायला या मजुरांनी प्राधान्य दिले आहे. आज शिर्डी महामार्गावर देवपूर फाट्याजवळ या मजुरांचा प्रवास सुरू होता.

काल मध्यरात्री 12 वाजता वाकडी येथून प्रस्थान केले.  हे मजूर कुठेही मुक्काम न करता चालत सिन्नर तालुक्यात देवपूर नजीक पोहोचले  आणखी दोन दिवसांचा प्रवास करून हे मजूर त्यांच्या गावी पोहोचतील असे सांगण्यात आले.

प्रशासन स्तरावरून वाहनांना परवानगी मिळत नसल्याने केवळ नाईलाज म्हणून आम्ही पायी प्रवास करत असल्याचे या मजुरांनी सांगितले.  ज्या द्राक्ष बागायतदाकडे हे मजूर कामाला होते त्याच्याकडून वाहनाची व्यवस्था न झाल्याने गेला संपूर्ण आठवडा वाया गेला.

सुरुवातीला 31 मार्च नंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र पंतप्रधानांनी 14 एप्रिल ची घोषणा केल्यावर कमावलेले पैसे इथेच खर्च होण्यापेक्षा गावाकडे परत गेलेले अधिक चांगले. आमच्यासारखे शेकडो कुटुंबे कामानिमित्त बाहेर असून सर्वांना आता गावाची ओढ लागली आहे. दोन दिवस पुरेल इतकी शिदोरी सोबत घेतली असल्याचे या मजुरांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com