त्र्यंबकेश्वराच्या विश्वस्त आणि पुजाऱ्यांना लागले नगराध्यक्षपदाचे वेध

0

देशदूत डिजिटल विशेष

त्र्यंबकेश्वर (मोहन देवरे) ता. १५ : लवकरच होऊ घातलेल्या त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणूकीसाठी शहरात राजकीय वातावरण तापले असून अनेक जणांना थेट होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत.

त्यात त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे दोन विश्वस्तांची नावे सध्या चांगलीच चर्चेत आहेत, तर एका मंदिर पुजाऱ्यांनाही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पक्षांकडे ही मंडळी तिकिटासाठी मागण्या करत असून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरालाही जोर आला आहे.

मध्यंतरी भाजपामधून एक माजी नगरसेवक नगराध्यक्षपदाच्या तिकीटाच्या अपेक्षेने काँग्रेसमध्ये गेले, तर आज राष्ट्रवादीचे माजी मंत्री व नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नगराध्यक्ष पदाच्या तिकीटासाठी शुक्ल इच्छूक असल्याचे समजते आज येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सुरवातीलाच त्यांची राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून ओळख करून दिल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान मंदिराचे पुजारी असलेल्या उल्हास तुंगार यांनीही नगराध्यक्षपदाच्या तिकीटाची राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केल्याचे आज खासगीत सांगितले.

दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंदिर ट्रस्टचे आणखी एक विश्वस्त कैलास घुले नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. घुले हे भाजपाचे तालुका पदाधिकारी असून ते या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजते.

इकडे पक्षाबाहेरील लोक ऐन निवडणूकीच्यावेळी तिकीटासाठी पक्षात येत असल्याने तळागाळातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी सर्वच पक्षांत जोरदार पक्षांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून राजकीय पक्षांच्या धुरिणांना त्यामुळे घोर लागला आहे. परिणामी अगदी वेळेवर उमेदवारांची यादी जाहीर करण्याची रणनीति  सर्वच पक्ष आखणार आहे.

याशिवाय भाजपा-सेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी होणार का? यावरही अनेक इच्छूकांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. जर युती किंवा आघाडी झाली, तर मात्र एका क्षणात इच्छूक नगराध्यक्ष माजी इच्छूक नगराध्यक्ष होऊ शकतात अशी खुमासदार चर्चाही त्र्यंबकेश्वर मध्ये रंगत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*