Monday, April 29, 2024
Homeनाशिकजि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया लांबली

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया लांबली

नाशिक । प्रतिनिधी 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया काही दिवस अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांना दिलेली चार महिन्यांची वाढीव मुदत 20 डिसेंबरला संपणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे पत्र ग्रामविकास विभागाकडून आल्यानुसार ही निवड प्रक्रिया 21 डिसेंबरला होईल, असे आडाखे बांधले जात होते. मात्र ग्रामविकास विभागाने एकाच दिवशी पुन्हा नव्याने दुसरे पत्र काढून ही निवड प्रक्रिया 20 डिसेंबरनंतर घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.

राज्यातील नवीन सरकारचे हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबरदरम्यान होत आहे. या पार्श्वभूमीवरच ग्रामविकास विभागाने हे पत्र काढल्याची चर्चा आहे. यामुळे नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम डिसेंबरअखेर की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होतो याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, ग्रामविकास विभागाने मंगळवारी सायंकाळी हे पत्र काढले होते. मात्र काही तासातच रात्री उशिरा नव्याने हे पत्र जिल्हा प्रशानाला पाठवले. जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकार्‍यांंची अडीच वर्षांची मुदत 21 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात पदाधिकार्‍यांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.

या मुदतवाढीचा अध्यादेश 23 ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता. त्यामुळे या तारखेपासून पुढे 120 दिवसांचा कालावधी ग्राह्य धरत ग्रामविकास विभागाने मंगळवारी नवीन आदेश काढत विद्यमान पदाधिकार्‍यांना दिलेली 120 दिवसांची मुदत 20 डिसेंबर रोजी संपत असल्याचे सांगत नवीन पदाधिकार्‍यांची निवड प्रक्रिया त्वरित करणे अपेक्षित असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकर कार्यवाही करावी, असे आदेश दिले होते.

त्यामुळे 20 डिसेंबरला मुदत संपत असल्याने त्याच दिवशी किंवा 21 डिसेंबरला नवीन अध्यक्ष निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून अजेंडा काढण्याची तयारीही बुधवारी होती. मात्र या पत्रापाठोपाठ काही तासातच नव्याने पत्र ग्रामविकासकडून प्राप्त झाले. यात 20 डिसेंबर रोजी वाढीव मुदत संपत असल्याने त्यानंतरही ही प्रक्रिया राबवण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासनाकडे लक्ष

त्यामुळे 20 डिसेंबरनंतर हा कार्यक्रम जाहीर होईल. साधारण कार्यक्रम जाहीर होण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो. हा कालावधी लक्षात घेता डिसेंबरअखेर नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर केला जाऊ शकतो. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून निर्णय होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या