जि. प. अध्यक्ष चषकसाठी वाढीव निधी देऊ; अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर : स्पर्धेचे उद्घाटन
स्थानिक बातम्या

जि. प. अध्यक्ष चषकसाठी वाढीव निधी देऊ; अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर : स्पर्धेचे उद्घाटन

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून स्पर्धेत खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा संधी म्हणून उपयोग करावा. स्पर्धेला वाढता प्रतिसाद बघता त्यासाठी निधी वाढवून देऊ, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले.

 सोमवारी (दि.10) छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचे क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड, सभापती सुरेखा दराडे, संजय बनकर, अश्विनी आहेर, सुशिला मेंगाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके उपस्थित होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, की जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा आयोजीत करणारा नाशिक हा एकमेव जिल्हा आहे.

पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी ही शाळा त्याचे उत्तम उदाहरण आहे. नाशिक जिल्ह्यातील स्पर्धा विभाग स्तरावर घेवून जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभापतींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. खो-खो स्पर्धेचा स्टॉस उधळून अध्यक्ष क्षीरसागर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. या प्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर, नितीन बच्छाव यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

आज पारितोषिक वितरण

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा मंगळवारी (दि.11) समारोप होणार आहे. दुपारी 2.30 वाजता अध्यक्षांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात येईल. 20 क्रीडा प्रकारांमध्ये या स्पर्धा होत असून, जिल्ह्यातील 1936 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. वत्कृत्व, चित्रकला स्पर्धेत 30, खो-खो, कबड्डी, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गीत गायन, धावणे आदी प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

या स्पर्धेत जिल्ह्यातील 15 तालुक्यातील कबड्डी, खो-खो स्पर्धेत एकूण 60 संघातील 720 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सांस्कृतिक स्पर्धेत सुध्दा प्रत्येक तालुक्यातील समूह गायन,समूह डान्स संघांनी सहभाग घेतला आहे.कबड्डी मुलांच्या स्पर्धेत सुरगाणा संघाने कळवण संघाचा सांघिक खेळाच्या जोरावर 57 विरुध्द 25 असा 32 गुणाने पराभव केला तर दुसर्‍या उपांत्यफेरीच्या सामन्यात दिंडोरी संघाने निफाड संघाचा 49 विरुद्ध 36 असा13 गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.मुलींच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात दिंडोरी संघाने सुरगाणा संघाचा 45 विरुद्ध 11 असा 34 दणदणीत पराभव केला तर दुसर्‍या उपांत्यफेरीच्या सामन्यात नाशिक संघाने पेठ संघाचा 28 विरुध्द 13 असा 15 गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात सुरगण्याच्या महेश पवार,जगदीश वारडे,मिलिंद खांबाईत,, राहुल जाधव, भगवान चव्हाण, समीर पडावी, प्रमोद चव्हाण यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर दिंडोरी संघाचा 49 विरुध्द 41 असा 8 गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावले मुलींच्या अंतिम फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात नाशिक संघाने दिंडोरी संगचा 36 विरुद्ध 30 असा 6 गुणांनी पराभव करून मुलींच्या गटाचे अजिंक्यपद पटकावले. विजयी संघा कडून माया फसाळे, भीमा खाडे, दामिनी बंडकोळी, फश्या फसाळे, कावेरी फसाळे,सुरेखा फसाळे, जनाबाई फसाळे यांनी चांगला खेळ केला.

खो खो च्या मुलींच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पेठ संघाने सुरगाणा संघाचा 12 गुणांनी पराभव करून अजिंक्यपद पटकावले.पेठ विजयी विरुध्द त्रंबकेश्वर, सुरगाणा विजयी विरुद्ध दिंडोरी.मुले उपांत्यफेरी निकाल-सुरगाणा विजयी विरुद्ध त्र्यंबकेश्वर , दिंडोरी विजयी विरुद्ध पेठ.

Deshdoot
www.deshdoot.com