..त्याला सोडा नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील; उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा नाशिकमधून ताब्यात
स्थानिक बातम्या

..त्याला सोडा नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील; उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा नाशिकमधून ताब्यात

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास दहशतवाद विरोधी पथकाने आज मुंबईतून ताब्यात घेतले होते. यानंतर या व्यक्तीला सोडून द्या नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी उत्तरप्रदेशच्या सोशल मीडिया डेस्कला दिली होती. यानंतर या तरुणाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र एटीएस पथकाने चुनाभट्टी येथून शनिवारी अटक केली होती.

आज या तरुणाला उत्त्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे पोलिसांच्या वतीने नागरिकांच्या मदतीसाठी सोशल मीडिया डेस्क सुरू करण्यात आला होता. या डेस्कसाठी असलेल्या मोबाइल क्रमांकावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याचा एक निनावी संदेश आला होता.

या संदेशामुळे उत्तर प्रदेशमधील पोलिस यंत्रणा दक्ष होत तपास करत होती. याबाबत लखनऊ येथील गोमतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला.

दरम्यान, हा फोन महाराष्ट्रातून आल्याचे कळताच याबाबतची माहीती उत्तर प्रदेश पोलिसांनी एटीएसला दिली आणि तपासाची चक्रे फिरली.

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने कामरान खान या तरुणाला चुनाभट्टी येथील म्हाडा कॉलनीतून शोधून काढले. यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. ट्रान्झिट रिमांड मंजूर झाल्यानंतर त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, या तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी एका २० वर्षीय युवकाने ‘या व्यक्तीला सोडून द्या, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी उत्तरप्रदेशच्या सोशल मीडिया डेस्कला दिली होती.

यानंतर यांत्रिक तपासयंत्रणा गतिमान करण्यात आल्या. त्यानंतर हा संदेश नाशिकमधून आल्याचे समोर आले. यानंतर नाशिकच्या दहशतवाद विरोधी युनिटच्या माध्यमातून गुप्त माहितीच्या आधारे या २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्यानेच धमकी दिल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्यास पुढील कारवाईसाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे. ही कारवाई, दहशतवाद विरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सपोनि संदीप घुगे, सपोनि अनिता पाटील, पोउनि राजाराम सानप, पोहवा संपत जाधव, पोना एजाज पठाण, पोना अलिम शेख, पोना युसुफ पठाण, पोना सुदाम सांगळे, पोना अभिजीत बेलेकर, पोहवा अजित गिते, पोना दिपक
राऊत, पोशि गोविंद जाधव व दहशतवाद विरोधी पथक, नाशिक युनिट यांनी ही कामगिरी केली.

Deshdoot
www.deshdoot.com