2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’
स्थानिक बातम्या

2 फेब्रुवारी रोजी रंगणार ‘योगाथॉन-2020’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । ‘एसडीएमपी योगाथॉन-2020’साठी विविध भागांतील तब्बल दीड हजारांहून अधिक महिला योग साधकांनी नोंदणी केली आहे. सूर्यनमस्कारातून सर्वांगीण आरोग्याचा संदेश देण्याहेतूने डी. एम. पगार हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी (एसडीएमपी) संस्थेच्या वतीने 2 फेब्रुवारी रोजी मुली व महिलांसाठी 108 सूर्यनमस्कारांची मेगा मॅरेथॉन अर्थात योगाथॉन रंगणार असल्याची माहिती डॉ. स्वाती पगार यांनी दिली.

गंगापूररोडवरील सुयोजित व्हेरिडियन व्हॅलीत पहाटे साडेसहा वाजता या अनोख्या उपक्रमाला सुरूवात होणार आहे. त्यात महिलांसह 12 वर्षांवरील मुलींना सहभागी होता येईल. मिसेस ग्लोबल युनायटेड डॉ. नमिता कोहोक उपक्रमाच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असून, त्याच्या शुभारंभाप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

उपक्रम यशस्वितेसाठी विविध भागांतील सर्व योगशिक्षक, योगसाधक, योग संस्था, आरोग्यासाठी कार्यरत संस्था प्रयत्नशील आहेत. गेल्यावर्षी या उपक्रमात 750 नाशिककर सहभागी झाले होते. यंदाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे डॉ. पगार यांनी सांगितले. दरम्यान, उपक्रमाच्या ठिकाणी नाशिक फिजिओथेरपीस्ट असोसिएशनच्या वतीने तज्ज्ञ फिजिओथेरपीस्ट उपलब्ध राहणार आहेत. या ‘योगाथॉन-2020’ साठी दीड हजारांहून अधिक महिला योग साधकांची नोंदणी झाली असून पुुढील आठवड्यात टी-शर्ट वाटप केले जाणार आहे.

सूर्याष्टकम ठरणार आकर्षण

सूर्यदेवतेच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या अनोख्या उपक्रमात आदित्य याग केला जाणार आहे. याच उपक्रमादरम्यान साई योग अकॅडमीचे बालयोगी र्‍हिदमिक सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. ही प्रात्यक्षिके सहभागी साधकांसह हा उपक्रम पाहण्यासाठी आलेल्या सर्वांसाठी आकर्षण ठरणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com