पुढील आदेश येईपर्यंत नाशिकमधील वाईन शॉप पूर्णपणे बंद – जिल्हाधिकारी
स्थानिक बातम्या

पुढील आदेश येईपर्यंत नाशिकमधील वाईन शॉप पूर्णपणे बंद – जिल्हाधिकारी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

दीड महिन्यानंतर आज पहिल्यांदाच मद्याची दुकाने उघडण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, अचानक तळीरामांनी दुकानांवर सकाळपासून गर्दी केल्यामुळे अनेक भागात सामाजिक अंतराचे नियम पाळले गेले नाहीत.

अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी वाढवावा लागला. मद्याच्या बाटल्या घेण्यावरून ग्राहक आणि दुकानाचे संचालक यांच्या हमरी तुमरी झाली. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी पोलिसांनी काही भागात लाठीचार्ज देखील केला.

यामुळे आजच्या परिस्थितीसारखी वेळ पुन्हा येऊ नये. हे करोनाच्या शिरकावामुळे योग्य नाही. म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज आपत्ती व्यवस्थापन कायद्या अन्वये प्राप्त अधिकाराने आजपासून सर्व मद्याची दुकाने बंद केली आहेत. ही दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद राहतील असेही त्यांनी सांगितले आहे.

आज सकाळपासून मद्याची दुकाने उघडल्यामुले मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण होते. हींनी तर चक्क सकाळपासूनच दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. तर काहींनी रणरणत्या उन्हात उभे राहून मद्य खरेदी केले होते.

नाशिक शहर रेड झोनमध्ये असले तरी प्रशासनाने दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने अनेकांनी मोर्चा मद्य घेण्याकडे वळवला होता. मात्र, अनेक भागात प्रचंड गर्दी झाली. सामाजिक अंतराचा फज्जा उडाला. दुसरीकडे तळीरामांची दुकानाजवळच नंबरवरून हाणामारी झाल्याचे आढळून आले. यासाठी पोलीस यंत्रणेला अतिरिक्त बंदोबस्त तैनात करावा लागला.

रेड झोनमधील भरमसाट गर्दीचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले होते. दुसरीकडे करोना या भयानक आजाराच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय गंभीर बाब होती. यामुळे नियमांची पायमल्ली झाल्यामुळे संपूर्ण नाशिकमध्ये पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. मद्याची दुकाने पुन्हा बंद झाल्यामुळे तळीरामांच्या गोटात प्रचंड निराशा पसरली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com