नाशिकमध्ये करोनाचा तिसरा बळी; अंबडलिंकरोड येथील मृत्यू झालेली व्यक्ती करोना पाॅझिटिव्ह; अशी आहे ‘हिस्ट्री’
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये करोनाचा तिसरा बळी; अंबडलिंकरोड येथील मृत्यू झालेली व्यक्ती करोना पाॅझिटिव्ह; अशी आहे ‘हिस्ट्री’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

आज नाशिकमध्ये सकाळी दोन अहवाल करोना पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एक अंबड लिंक रोड येथील तर दुसरा रुग्ण वडाळागावातील आहे. यामध्ये करोना संशयित म्हणून दाखल असलेल्या अंबडलिंक रोड येथील रुग्णाचा मंगळवारी (दि.१९) रोजी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याचे स्वाब नमुने घेण्यात आले होते. आज या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला यामध्ये हा रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. आतापर्यंत नाशिक शहरात तीन तर जिल्ह्यात ४३ रुग्ण करोनाच्या संसर्गाने दगावले आहेत.

नाशिक शहरात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये ३७ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शहरात एकूण २२ परीसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

आज आढळून आलेला दुसरा रुग्ण वडाळा गाव परिसरातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील २० वर्षीय मुलगा आहे. त्याचा निकटवर्तीय म्हणून घशाचा स्वब नमुना तपासणीला पाठवला होता. आज अहवाल प्राप्त झाला असून हा मुलगा करोना पॉझिटिव्ह आला आहे.

अंबड लिंक रोड परिसरातील संजीव नगर शिवार आज पाॅझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा मुलगा मुंबई येथे (दि.२ मे २०२०) रोजी अंत्यविधीसाठी गेले होते. तिथून ते ५ मे २०२० रोजी नाशिकला आले होते.

यानंतर मंगळवारी (दि.१९)  रोजी त्याच्या वडिलांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याच दिवशी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या घशाचे स्वाब नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून मृत व्यक्ती करोना पाॅझिटिव्ह आढळून आली आहे.

दरम्यान, या व्यक्तीच्या संपर्कातील २० व्यक्तींना झाकीर हुसेन हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांचे स्वाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचा राहता परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्याची कार्यवाहीदेखील सुरु असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com