प्रसूती झालेली महिला करोना पाॅझिटिव्ह तर दुसरा रुग्ण टॅक्सी चालक; नाशकात आढळून आलेल्या दोघा रुग्णांची अशी आहे हिस्ट्री

प्रसूती झालेली महिला करोना पाॅझिटिव्ह तर दुसरा रुग्ण टॅक्सी चालक; नाशकात आढळून आलेल्या दोघा रुग्णांची अशी आहे हिस्ट्री

नाशिक | प्रतिनिधी 

आज नाशिक शहरात दोन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एक रुग्ण गंगापूर रोड परिसरातील नवश्या गणपती जवळील आहे. तर दुसरा नवीन नाशिकमधील पंडित नगर परिसरातील दुसरा रुग्ण आहे. दोन्हीही परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

नाशिक महापालिकेकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत नाशिक शहरातील करोना रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढून २४ वर पोहोचली आहे.

आज आढळून आलेला बाधित रुग्ण सिडको पंडित नगर शनी मंदिर परिसरातील आहे. ३५ वर्षीय असलेली ही व्यक्ती टॅक्सी चालक आहे. त्याला सर्दी-खोकला झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोमवारी (दि.११)  दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशाचे स्राव नमुने घेऊन तपासणीला पाठविले होते. आज या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले यामध्ये अहवाल बाधित आढळून आले आहेत.

दुसरा रुग्ण नवश्या गणपती परिसर येथील ३२ वर्षीय महिला आहे. महिला गरोदर असल्याने वैद्यकीय उपचारासाठी ९ मे २०२० रोजी गंगापूर रोड येथील देसले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

यादरम्यान, या महिलेचे सिझर करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानंतर महिलेला करोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे तिच्या घशाचे स्राव घेऊन तपासणीला पाठविले होते. यानंतर या महिलेचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो बाधित आढळून आला आहे.

दरम्यान, हे दोन्ही परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याचा आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढला आहे. यानुसार त्यानुसार देसले हॉस्पिटल पूर्णपणे संस्थात्मक अलगिकरण म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

देसले हॉस्पिटल मधील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेले डॉक्टर, नर्स, रुग्णालय कर्मचारी व त्या दरम्यान रुग्णालयात उपस्थित असलेले इतर नातेवाईक या सर्वांना देसले हॉस्पिटल येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले असून त्यापैकी हायरिस्क कॉन्टॅक्ट चे तपासणी नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com