आवर्तनाचे पाणी फुगवटा तोडून थेट शेतात; दारणा नदीपात्रालगत पिके नष्ट होण्याची भीती

आवर्तनाचे पाणी फुगवटा तोडून थेट शेतात; दारणा नदीपात्रालगत पिके नष्ट होण्याची भीती

घोटी | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील भावली व काळूस्ते येथील भाम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दारणा धरणातील पाण्याचा फुगवटा झपाट्याने वाढला. त्यामुळे परिसरातील गावात नदीपात्रालगतच्या शेतात पाणी पसरल्याने बागायती पिके धोक्यात आली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

दारणा धरणाच्या फुगवट्यात भाम, भावली धरणातून मोठया प्रमाणात पाणी आल्याने दौंडत, माणिकखांब, मुंढेगाव, उंबरकोन, सोमज, मोगरे उभाडे, पिंपळगाव मोर आदी भागात धरणाचे पाणी तुंबल्याने नदीपात्रालगतच्या शेतकऱयांचे धाबे दणाणले आहे. वरील परिसरातील नदीपात्रालगतच्या शेतात फुगवट्याचे पाणी पसरल्याने बागायती पिकांना धोका पोहचू लागला आहे. नदीपात्रालगतच्या शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात लागवड खर्च करून टोमॅटो, वांगी, काकडी, आदी बागायती व रब्बी पिके घेतली आहेत मात्र काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा, मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट तसेच करोना रोगामुळे शेतकऱयांनी घेतलेली धास्ती, बाजारपेठा बंद मुळे शेतमालाची खरेदी विक्री थंडावली असून आधीच शेतकरी त्रस्त झाला असून त्यात बागायती पिकातच आता पाणी शिरल्याने शेतकरी वर्गापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

दारणा धरणातून होणारा विसर्ग थांबल्याने तसेच भावली, भाम धरणातून विसर्ग सुरूच असल्याने हिं परिस्थिती ओढवल्याचे शेतकरी बांधवांनी नमुद केले. या व अशा गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी नेत्यांचे लक्ष नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.याबाबत प्रशासनाने लक्ष घालून शेतकरी वर्गाला या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी अनेक शेतकऱयांनी केली आहे.

गेल्या दोन महिन्यापूर्वीही अशीच परिस्थिती ओढवली होती. दारणा नदीपात्रालगतच्या अनेक शेतक-यांच्या शेतात फुगवटयाचे पाणी शिरल्याने तेव्हाही शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र त्यावेळी दारणा धरणातून तुरळक विसर्ग केल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला होता मात्र दोन तीन महिन्यातच पुन्हा ही स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी बांधवांनी डोक्याला हात  लावला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com