उद्या संपूर्ण नाशिक शहरात ‘पाणी’ नाही; बत्तीही होणार ‘गुल’
स्थानिक बातम्या

उद्या संपूर्ण नाशिक शहरात ‘पाणी’ नाही; बत्तीही होणार ‘गुल’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

महावितरण कंपनीने दरवर्षीप्रमाणे पावसाळापूर्वी करण्यात येणाऱ्या विविध कामांसाठी शनिवार (दि. ३०) रोजी सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहरातील दोन्ही वेळचा पाणीपुरवठा होणार नाही. व रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची सर्व नाशिककरांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेकडून करण्तयात आले आहे.

मनपाचे गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 केव्ही सातपूर व 132 केव्ही महिेंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ केव्ही वीज पुरवठा केला जातो.

सदर ओव्हरहेड लाईन फिडरपासून ते जॅकवेल सबस्टेशनपर्यन्त सर्वसाधारणपणे १० ते ११ कि.मी. एवढ्या अंतराची आहे. या लाईनवर दरवर्षी पावसाळयापूर्वी अडथळा ठरणाऱ्या फांदया छाटणे, कट पॉईंट व विक जम्परिंग सर्व्हिसिंग करणे, सिक्स पोल स्ट्रक्चर दुरुस्ती कामे करणे, फिडरवरील ब्रेकर सर्व्हिसिंग करणे ही कामे केली जातात.

त्याकरीता महावितरण कंपनीने दरवर्षी नियमितपणे करण्यात येणाऱ्या कामांसाठी शनिवार (दि. 30) रोजी सकाळी 9.00 ते 6.00 वाजेपर्यंत  वीज पुरवठा बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच मुकणे धरण पंपींग स्टेशन वीज पुरवठा करणारे २२० केव्ही रेमण्ड सबस्टेशन येथे महावितरण कंपनीस पावसाळापूर्व दुरुस्ती कामे करावयाची असुन त्यांनी देखील वीज पुरवठा बंद ठेवणार असल्याचे मनपास सांगितले आहे.

महावितरण कंपनी वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने या काळात मनपाचे गंगापूर डॅम पंपींग स्टेशन येथील पंपहाऊसमधील मोटर फिडर सर्व्हिसिंग करणे, सबस्टेशन व पॅनलरुमधील ब्रेकर्स सर्व्हिसिंग करणे, जम्परिंग व डिओ सर्व्हिसिंग करणे, कंट्रोल सप्लाय तपासणे, इ. कामे करुन घेतली जाणार आहेत.

त्यामुळे  गंगापूर धरण पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून पंपींग केले जाणार नाही. म्हणून उद्या शनिवार (दि. 30) रोजी संपूर्ण नाशिक शहरातील दूपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व रविवार (दि. 31) रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com