मालेगावी दोन महिलांचा अतिदक्षता विभागात मृत्यू
स्थानिक बातम्या

मालेगावी दोन महिलांचा अतिदक्षता विभागात मृत्यू

Dinesh Sonawane

मालेगाव | प्रतिनिधी 

मालेगाव सामान्य रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास दोन महिलांचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाल्याची घटना घडली. या महिलांना न्युमोनिया, श्वसनाचा, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी देशदूतशी बोलताना दिली. यामध्ये एक ५८ वर्षीय महिला मालेगाव शहरातील असून दुसरी महिला नांदगाव तालुक्यातील असल्याचे समजते. या महिलेचे वय साधारणत: ४८ वर्षे सांगण्यात आले आहे.

मालेगाव शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही महिलांचे घशातील स्वब नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहे. हा अहवाल आल्यानंतरच या महिलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर येणार आहे.

अधिक माहिती अशी की, मालेगाव शहरातील आणि नांदगाव तालुक्यातील दोन्ही महिला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी शनिवारी दाखल झाल्या होत्या. यातील एका महिलेला श्वसनाचा अधिक त्रास होत होता तर दुसरी मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासाने ग्रासली होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्याचे येथील डॉक्टरांनी ठरवले होते.

रविवारी रात्री या महिलांचा त्रास अधिकच वाढला होता. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास या महिलांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले. सध्या कोरोना विषाणूचे सावट मालेगाववर असल्यामुळे दोन्हीही महिलांचे स्वब नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

उद्या रात्रीपर्यंत हे अहवाल येण्याची शक्यता आहे. हे अहवाल आल्यावरच या महिलांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. मृत्युनंतर महिलांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com